
सामना प्रतिनिधी । कुडाळ
जय – पराजय जनता ठरवेल. मात्र निलेश राणे यांनी माझा पराभव करूनच दाखवावा. माझा पराभव करण्यासाठी राणेंनी आधी आपले मैदान निश्चित करावे असे प्रतिआव्हान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी स्वाभिमानचे माजी खा.निलेश राणे यांना देत त्यांनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला. राणे म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारा ‘दिवाळी अंक’ आहे. मी, म्हणजे नेहमी प्रकाशित होणारं वृत्तपत्र अशी बोचरी टीकाही आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणेंवर केली.
आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी कुडाळ तालुक्यात दौरा करून विकासकांचा शुभारंभ केला. दरम्यान त्यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. निलेश राणेंनी केलेल्या टीकेचा आ.नाईक यांनी यावेळी चांगलाच समाचार घेत प्रतिआव्हान दिले. ते म्हणाले की, “जिल्ह्यातील मच्छिचा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारात आहे. मुख्य सचिव याबाबत गोवा सरकारशी बोलणार आहेत. लवकरच महाराष्ट्र आणि गोवा सरकार याप्रश्नी कायमचा तोडगा काढणार आहे. मात्र, मच्छिमारांच्या प्रश्नांचं काहीजण राजकीय भांडवल करताना दिसत आहेत असा टोला आ.नाईक यांनी यावेळी लगावला.
राणेंचा ‘स्वाभिमान’ पक्ष फक्त तडजोडीसाठी आहे. २०१९ च्या निवडणूकीसाठी देशात आतापर्यंत ५०० पक्षाची स्थापना झाली आहे. राणेंचा ‘स्वाभिमान’ त्यातलाच एक पक्ष आहे. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच राणेंना भाजपने खासदारकी दिली आहे. म्हणूनच, राणे जाहीर सभा घेऊन शिवसेनेवर टीका करत आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचे कार्यकर्तृत्व देशपातळीवर पोहचलंय हे राणेंनी लक्षात घ्यावे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेची राष्ट्रीय पक्षांनाही दखल घ्यावी लागत आहे. ठाकरे यांच्या राम मंदिराच्या मुद्द्याने भाजपची चांगलीच झोप उडाली आहे. राणे फक्त जिल्ह्यापुरते मर्यादितच राहिल्याचा टोला वैभव नाईक यांनी निलेश राणेंना लगावला.
मच्छिमारांच्या प्रश्नात तिसरा डोळा उघडायला लावू नकात, असं ठणकावून सांगणारे आमदार नितेश राणे आहेत कुठे ? का उघडला नाही तिसरा डोळा ? असा खोचक सवालही आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित करीत त्यांचा समाचार घेतला.


























































