दिल्लीच्या शाळांमध्ये मोबाईल बंदी, शिक्षकांसाठीही नियम लागू होणार

दिल्लीतील शाळांमध्ये मुले यापुढे मोबाईल घेऊन जाऊ शकणार नाहीत. दिल्ली शिक्षण प्राधिकरणाने शाळेमध्ये मोबाईल फोन नेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. शिक्षणावर विद्यार्थ्यांना लक्ष्य केंद्रीत करता यावं यासाठी दिल्ली शिक्षण प्राधिकरणाने सरकारी आणि खासगी दोन्ही प्रकारच्या शाळांमध्ये वर्गात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घातली आहे. या बंदीचे काटेकोर पालन व्हावे यासाठीची जबाबदारी पालकांवरही असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाईलवर बंदी का घालण्यात आली ?

दिल्ली शिक्षण प्राधिकरणाने दिल्लीतील शाळांसाठी एक सर्वसमावेशक आदेश जारी केला आहे . त्यात म्हटले आहे की, हे एक ठोस पाऊल उचलण्यात आले असून विद्यार्थ्यांचे लक्ष्य वर्गातील शिक्षणावर केंद्रीत केलेले असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली शहरातील सरकारी आणि खासगी दोन्ही शाळांमध्ये मोबाईल वापरता येणार नाही.

ही सूचना केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठीही आहे, त्यांनाही वर्गात मोबाइल घेता येणार नाही. शिकवणे आणि शिकणे या दोन्हीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. शाळेचे वर्ग, प्रयोगशाळा , ग्रंथालये आणि खेळाच्या मैदानातही मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे .

आपल्या मुलांनी मोबाईलबंदीचे पालन केले पाहिजे याची काळजी घेणे ही आता पालकांची जबाबदारी असल्याचे प्राधिकरणाच्या आदेशात म्हटले आहे. जर एखाद्या  विद्यार्थ्याने नकळत मोबाईल आणला तर तो लॉकरमध्ये ठेवण्यात यावा आणि यासाठी लॉकरची सुविधा निर्माण करून देण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे. पालकवर्गाकडून या आदेशाचे स्वागत होत आहे.