मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही, आता त्यांचा पराभव करणे ही आपली जबाबदारी

सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. मोदींनी 2014 च्या निवडणुकीत शब्द दिला होता की, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील. गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पण, मोदींनी सत्तेत आल्यावर दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे आता त्यांचा पराभव करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज चोपडा येथे झालेल्या सभेत केले.

महाविकास आघाडीचे रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, शरद पवार यांनी पेंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 2014 मध्ये मोदींनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण दहा वर्षांत महागाई काही कमी झाली नाही. गॅस सिलिंडरचा भाव 410 वरून 1160 वर गेला आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे वचन त्यांनी दिले होते तेही पूर्ण केले नाही. आज बेरोजगारी वाढली आहे. सत्तेचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो, पण मोदी सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

चोपडा येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टीका सहन होत नसल्याने विरोधकांना जेलमध्ये टाकतात

मोदींचे राज्य हे वेगळ्या दिशेने चालले आहे. मोदींना त्यांच्याविरुद्ध टीका केली की आवडत नाही, त्यांना टीका सहन होत नसल्याने ते विरोधकांना जेलमध्ये टाकतात झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली. म्हणून त्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले, असे शरद पवार म्हणाले.

मोदींनी दहा वर्षात काय केल ते सांगाव

मोदी देशाच्या कानाकोपऱयात फिरत आहेत, पण जाऊन सांगतात काय? मोदींनी दहा वर्षात काय केल ते सांगावे. 2014 मध्ये जेव्हा आम्ही सत्तेत होतो त्यावेळी ते आम्हाला महागाईला जबाबदार ठरवत होते. मला सत्ता द्या, पन्नास दिवसात महागाई कमी करतो, असे मोदी सांगत होते. आज दहा वर्षे झाली, महागाई काही कमी झालेली दिसत नाही, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात

शरद पवार हे जळगाव जिह्याच्या दौऱयावर होते. त्यांची चोपडा येथील सभा आटोपल्यानंतर ते भुसावळ येथील बैठकीला जात असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील किनगाव जवळ शरद पवार यांच्या मागे आलेल्या (एमएच 15 सीएम 9276) आणि (एमएच 48 एस 5895) दोन वाहनांचा अपघात झाला. दोनही गाडय़ा एकमेकांवर आदळल्या. या अपघातात दोनही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.