
गिरगाव चौपाटीवर येणाऱया पर्यटक-नागरिकांसाठी पालिकेने फिरत्या वाहनावरील (मोबाईल टॉयलेट) उपलब्ध करून दिले आहे. 90 टक्के पाणी बचत करणाऱया या प्रसाधनगृहातील यंत्रणा सौर उर्जेवर चालणारी आहे.
महिलांसाठी 1 आणि पुरुषांसाठी 1 असे एकूण 2 शौचकुपे असलेले हे प्रसाधनगृह एका वाहनावर निर्माण करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार हव्या त्या ठिकाणी नेऊन प्रसाधनगृह सुविधा पुरविता येते. प्रत्येक फ्लशमध्ये सुमारे सव्वा लिटर पाण्याचा उपयोग या शौचालयात होतो. त्यामुळे 200 लिटर पाण्याचा उपयोग करून जवळपास 100 फ्लश करता येतात. सर्वसाधारण प्रसाधनगृहांमध्ये 200 लिटर पाण्यात 20 फ्लश होतात. म्हणजेच प्रत्येक फ्लशमध्ये किमान 10 लिटर पाणी वापरात येते. या हिशेबाने सदर निर्वात प्रसाधनगृहामध्ये तब्बल 90 टक्के पाण्याची बचत होते. या प्रसाधनगृहातील निर्वात यंत्रणा सौर ऊर्जेवर कार्यरत राहते. त्यामुळे ते पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे. मेसर्स व्हॅकमॅन सॅनिटेशन सोल्यूशन प्रा. लि. यांच्या वतीने पालिकेला सदर फिरते निर्वात प्रसाधनगृह विनामूल्य तत्त्वावर पुरविले आहे. गिरगाव चौपाटीवर आज या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष मीनल पटेल, नगरसेविका अनुराधा पोतदार, उपआयुक्त परिमंडळ – 1 विजय बालमवार, डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या व सिटीझन्स अॅक्शन नेटवर्क संस्थेच्या पदाधिकारी इंद्राणी मलकानी उपस्थित होते.
24 तास सुविधा
हे प्रसाधनगृह 24 तास उपलब्ध राहणार असून त्यासाठी 2 वाहनचालक नेमले आहेत. सद्यस्थितीत सदर प्रसाधनगृह प्रायोगिक तत्त्वावर पर्यटकांना वापरासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. चौपाटीवर देशभरातून आणि विदेशातूनदेखील पर्यटक येत असतात. त्यांच्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. संपूर्णपणे पर्यावरणस्नेही हे प्रसाधनगृह प्रायोगिक तत्त्वावर पुढील सहा महिने कार्यरत राहणार आहे.


























































