मोदी आणि शहा महाराष्ट्राला लुटताहेत; नाशिक येथे विराट सभेत ठाकरी घणाघात

>> देवेंद्र भगत / राजेश चुरी / बाबासाहेब गायकवाड

जेव्हा धर्मावर अधर्माचं संकट आलं तेव्हा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम आणि आदिशक्ती भवानी मातेने वेगवेगळे अवतार धारण करून राक्षसांचा वध केला तीच वेळ आता आली आहे… राक्षसांचा वध करण्याची

 मोदी आणि शहा माझा महाराष्ट्र लुटत आहेत, महाराष्ट्राचे वैभव ओरबाडत आहेत. त्यांच्याविरोधात लढायला मी उभा ठाकलो आहे. काहीही झाले तरी त्यांना महाराष्ट्र ओरबाडू देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले. नाशिकच्या ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उसळलेल्या जनसागराच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी लढाईची हाक दिली. आता दृढनिश्चय करा. ‘जय भवानी जय शिवाजी’ हा नारा महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यात असा घुमला पाहिजे की दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले पाहिजेत, अशी शिवगर्जनाच उद्धव ठाकरे यांनी केली तेव्हा एकनिष्ठsची वज्रमूठच तमाम शिवसैनिकांनी आवळली.

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम काढले. पण जम्मू-कश्मीरमध्ये अजून स्थिती सुधारली नाही. अजूनही तिकडे हत्या होतात. आता यांचे एक घोषवाक्य आहे… एक विधान, एन निशाण आणि एक प्रधान! मात्र एक निशाण म्हणजे आमचा तिरंगा पाहिजे. भाजपचे फडके नको. एक निशाण म्हणजे भाजपचे निशाण, एक विधान म्हणजे मोदी लिहितील ते आणि एक प्रधान म्हणजे फक्त मोदी असे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. एक निशाण म्हणजे भारतमातेचा तिरंगा असेल, भाजपचे फडके नसेल आणि एक विधान म्हणजे बाबासाहेबांचे लिहिलेले संविधान असेल. तुम्ही निवडून दिलेला नाही तर एक प्रधान म्हणजे आमच्या जनतेने निवडून दिलेला असेल. जो तुमच्या ईव्हीएममधून आलेला नसेल.

पक्ष, मित्र, विरोधक, सर्वांनाच संपवायला निघालेत

भाजप विरोधकाला संपवतो. मित्र पक्षाला संपवतो. देशात हिंदुत्वावर निवडून आलेला विरोधकही नकोय. विरोधक, मित्रपक्ष, तुमच्याच पक्षातले नेते नको. फक्त मी आणि मीच. मध्य प्रदेशात ज्या शिवराज सिंह यांनी सत्ता आणून दिली त्यांनाच ‘मामा’ बनवले. छत्तीसगडमध्ये तसेच. आता योगी तुम्ही सांभाळा. कारण देशात सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशमधून निवडून येतात. जास्त खासदार निवडून आले तर योगींनाच काढून टाकतील. ‘योगी आप संभालो’ असा इशाराच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला.

…तर तुम्ही ‘पाव’उपमुख्यमंत्री झाला नसता

2014 साली युती का तोडली होती. मे महिन्यापर्यंत पाठिंबा मिळेपर्यंत ‘आ गले लग जा’ अशी स्थिती होती. जून महिन्यापर्यंत शिवसेना हिंदुवादी. मात्र जून ते ऑक्टोबरमध्ये असे काय झाले की शिवसेनेशी युती तोडली. शहांनी वचन तोडले नसते तर तुम्ही आतासारखे ‘पाव’ उपमुख्यमंत्री नाही तर अडीच वर्षे मुख्यमंत्री झाला असता, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फोडाफोडी केली नसती तर अख्खी ताकद तुमच्यासोबत राहिली असती आणि महाराष्ट्राने सन्मानाने तुम्हाला दिल्लीत पाठवले असते. तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता, पळवता, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपला कशासाठी मत देणार?

भाजपच्या नाकर्तेपणाचा दाखला देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण दिले. टेबलवर समजा एका पेल्यात विष आहे आणि एका पेल्यात काही आहे हे आपल्याला माहीत असेल, अशा वेळी आपल्याला एक प्याला रिकामा करायला सांगितल्यास तुम्ही काय पिणार? तेव्हा शिवसैनिकांमधून विष पिणार नाही, असा आवाज घुमला. याचप्रमाणे भाजपने दहा वर्षांच्या कारभारात नोकऱ्या दिल्या नाहीत, आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, नवीन उद्योग नाही, मग भाजपला मत कशासाठी देणार, असा सवालही त्यांनी केला.

हिंमत असेल तर घरगडी संस्था बाजूला ठेवून मैदानात या

भाजप सध्या सत्तेच्या जोरावर राक्षसी यंत्रणा घेऊन शिवसेनेवर हल्ला करीत आहे. शिवसेना संपवली मानता मग आता आमच्या मागे का लागता, असा सवालही त्यांनी या वेळी केला. इतकीच हिंमत असेल तर आम्ही सांगतो त्यांच्या घरी धाडी टाकून दाखवा, असे आव्हानच त्यांनी दिले. कर्नाटकात एका मंत्र्याला अशीच धमकी दिली असता त्यांनी भाजपच्या मंत्र्याचा 40 हजार कोटींचा घोटाळा पुराव्यानिशी उघड करण्याचा इशारा दिल्यावर भाजप थंड पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तुमच्यावरील, हिंदुत्वावरील संकटे आली ती शिवसेनेमुळे टळल्याचे त्यांनी सांगितले. हिंमत असेल तर घरगडी संस्था बाजूला ठेवून मैदानात या, चारशेपार काय ते नक्कीच दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र लुटला जातोय आणि मिंधे दिल्लीसमोर शेपूट हलवत बसलेत

काही दिवासांपूर्वी मोदी कोकणात जाऊन आले. बरे वाटले, कारण शिवरायांचा पुतळा बसवला. मात्र त्यांनी या ठिकाणचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवला. वर्ल्ड कप फायनल मॅच नेली. नाही तर आपण जिंकलो असतो. या वेळी पनौती, पनौती असा अशा जोरदार घोषणा झाल्या. काही दिवसांपूर्वी बायकॉट बॉलिवूड बोलत होते. मात्र कालच्या अयोध्येच्या सोहळ्यात सर्वच बॉलिवूड कलाकार होते. शंकराचार्य नाही. मात्र त्यांच्या भूमिका करणारे होते. हे यांचे थोतांड.  ज्यातून महसूल मिळेल ते गुजरातला नेतात. मिंध्यांच्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू दिल्लीसमोर शेपूट हलवतोय, लाज वाटत नाही का? हे बाळासाहेबांचे हिंदुत्व का? असा सवालही त्यांनी मिंध्यांना केला. ज्या महाराष्ट्राने तुम्हाला दिल्लीला नेले त्या महाराष्ट्राच्या मुळावर का उठलात, असा सडेतोड सवालही त्यांनी केला.

शिवसैनिक, माता-भगिनींचे आशीर्वाद हीच शिवसेनेची घटना

 समोर बसलेल्या शिवसैनिकांचा अथांग सागर म्हणजे शिवसेनेची खरी ताकद आहे. ही ताकद मला वडिलोपार्जित मिळाली आहे. या ताकदीने मला सांगावे की मी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले का! जर असे असेल तर मुख्यमंत्री पदाप्रमाणे मी माझे पदही सोडतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. या वेळी नाही नाही असा एकच आवाज घुमला. उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणा घुमल्या. या वेळी त्या नार्वेकरला सांगा की शिवसेना कुणाची असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. 2013मध्ये हेच गृहस्थ तेथे उभे होते. मुख्यमंत्री दाढी खाजवत माझ्या पाया पडत उभे होते, असेही ते म्हणाले. शिवसैनिक माता-भगिनींचे आशीर्वाद हीच शिवसेनेची घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख आपल्याला शिकवून गेले आहेत. शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. ज्यांना शेळी व्हायचं आहे त्यांनी खुशाल मिंध्यांकडे निघून जावे.

भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी

सध्या भाजपकडे कार्यकर्तेच नाहीत. दंगल झाली की शेपूट घालून पळणारी ही अवलाद आहे. शिवसेनेला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी आमच्या साध्या साध्या नेत्यांच्या घरी ईडी, सीबीआय या त्यांच्या घरगडय़ांच्या धाडी टाकता. धाडी टाकता ते टाकता आणि त्यांच्याच घरी पाय ताणून बसता. त्यामुळे भाजप म्हणजे भेकडांची पार्टी आहे. त्यामुळे येऊद्या आमची सत्ता, तुमच्या तंगडय़ा तुमच्या गळ्यात कशा घालतो बघा, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. या यंत्रणांचा पगार जनतेच्या खिशातील पैशातून केला जातो हे या यंत्रणांनी लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले.

हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार

मोदींच्या महाराष्ट्रवाऱ्या वाढल्या आहेत. आता ते पोहरादेवीलाही येणार आहेत. याच तुम्ही. सगळा महाराष्ट्र एकदा फिरून व्यवस्थित बघून घ्या. कारण हा महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता, तौक्ते वादळ आले होते तेव्हा मदत गुजरातला दिली. महाराष्ट्राने मागूनही एक पैसा दिला नाही. देशासाठी मन की बात आणि गुजरातसाठी धन की बात असा यांचा कारभार आहे. यांना निवडणुकांपुरता, मतांपुरता महाराष्ट्र आठवतो. निवडणुका आल्या की ते महाराष्ट्रात येतात. मणिपुरात फक्त दोन जागा आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यामुळेच मणिपूरला ते जात नाहीत, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.

जय भवानी… जय शिवाजी

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर गर्दीची लाट उसळली होती. त्यावर कटाक्ष टाकत उद्धव ठाकरे यांनी आदिशक्ती जगंदेबाला साकडे घातले. आज मी रामाचं हे कालस्वरूप बघतो आहे. बये दार उघड… बये दार उघड… दार उघडणार की नाही… त्यावर गर्दीतून ‘हो’ असा सूर उमटला. दार उघडल्यानंतर जर सरकार तुमच्या दारी आले तर त्यांना लाथ घालणार की नाही. निश्चय करणार आहात की नाही, त्यावर पुन्हा ‘हो’ असा तुफान प्रतिसाद मिळाला आणि शिवसैनिकांनी वज्रमुठी उंचावल्या. याच मनगटामध्ये तुमच्या पेटलेल्या मनाच्या मशाली पकडा आणि ‘जय भवानी जय शिवाजी’चा नारा हा महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यात असा घुमू द्या की दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले पाहिजेत, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी केली.

माझे आज तुम्हाला पुन्हा आव्हान आहे. सगळ्या घरगडी संस्था बाजूला ठेवा आणि या मैदानात… ईव्हीएम बाजूला काढा आणि या बॅलेट पेपरवर. मग अब की बार चारशेपार नाही, तुमचा कारभार चारशे मतांच्या आतच आटोपणार.

मत मागायला तुम्हाला हनुमानाची, रामाची गरज लागते तर मग तुम्ही दहा वर्षांत केलं काय? मोदीजी, राम भरोसे नाही काम भरोसे मते मागा.

माझे आजोबा सांगायचे, शांती ही मुडद्याची असते आणि क्रांती ही मर्दाची असते. तुम्ही मर्द आहात की मुडदे, हे तुम्हाला ठरवावं लागेल.

तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करत आहात. मोदीजी, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही!

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे यांचे घरगडी धाडी टाकतात. घर माझ्या कार्यकर्त्याचे आणि पाय ताणून बसतात हे नालायक. येऊ द्या आमची सत्ता, तुमच्या तंगडय़ा तुमच्या गळय़ात घालतो की नाही पहा.

माझ्याकडे शिवसेनाप्रमुखांनी दिलेली मर्द शिवसैनिक आहेत. ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे.

 स्वत: कडेकोट बंदोबस्तात राहायचं, पोलीस, निमलष्करी, लष्करी, बॉम्ब जॅमर लावून तुम्ही छपन्न इंचाची छाती दाखवता? अरे माझ्या शेतकऱ्याची हडकुळी छातीच तुम्हाला भारी पडणार आहे.

निष्ठावंतांचा महासागर उसळला

शिवसेनेच्या जाहीर सभेसाठी मंगळवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महासागर उसळला होता, भगव्या तेजाने आणि शिवसेनेच्या जयजयकाराने ते शिवसेनामय झाले होते. दुपारपासूनच शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. भगवे उपरणे घेतलेले शिवसैनिक शिवसेनेचा जयजयकार करत, ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत सभास्थळी आले. खांद्यावर शिवसेनेचे मशाल चिन्ह असलेले भगवे झेंडे डौलाने फडकवत होते. भव्य व्यासपीठ, सभोवतालचा भगवेमय परिसर, भगव्या कमानी लक्ष वेधून घेत होते. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ असा गगनभेदी जयघोष सुरू होता. तरुणांइतकीच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

शिवसेना एकच – संजय राऊत

या सभेत भाषण करताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. प्रभू रामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या आधी मोदींनी व्रतवैकल्य, उपवास केले  ब्लँकेटवर झोपले. पण देशातील चाळीस कोटी लोक फुटपाथवर झोपतात, 80 कोटी लोपं अर्धपोटी झोपतात. त्यामुळे मोदींनी ही सर्व नाटके बंद करावीत, असे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिबिरावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले की, त्या एकनाथ-फेकनाथ शिंदेंना मिरच्या झोंबल्या. आता मिरच्याच झोंबल्या, पण अजून ठेचा बाकी आहे. शिवसेना एकच आहे. कोणा मिंध्याची नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचीच आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

मोदी हे शेतकरी आणि ठाकरेंना घाबरतात

पंतप्रधान मोदी फक्त शेतकरी आणि ठाकरे नावाला घाबरतात. आता तर शेतकरीही ठाकरे यांच्या मागे उभे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

उद्योग-व्यवसाय गुजरातला नेण्याचा सपाटा – सुभाष देसाई

राज्यातील उद्योग शेजारच्या राज्यात नेले जात असल्याबद्दलचा  निषेध करणारा ठराव शिवसेनेच्या शिबिरात करण्यात आला. त्याचा उल्लेख करताना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळातही राज्यात उद्योग व्यवसाय आणले. उद्योग-व्यवसाय बंद पडू दिले नाहीत. पण आताच्या काळात राज्यात येणारे उद्योग गुजरातला पाठवण्याचा सपाटा लावला आहे, पण मिंधे सरकार त्याविरोधात काही बोलत नाही. कामगारविरोधी कायद्यांच्या विरोधातही हे सरकार काही बोलत नाही. उद्योगपतींचे गुलाम झालेले हे सरकार कामगारांचा बळी देण्यास निघाले आहे, अशा शब्दांत सुभाष देसाई यांनी टीका केली.

पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार – भास्कर जाधव

1994 मध्ये नाशिकमध्ये शिवसेनेचे महाशिबीर झाले आणि 1995 मध्ये राज्यात शिवसेनेची सत्ता आली. आता पुन्हा नाशिकमध्येच सभा होत आहे. त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  हिंदुत्ववादी सरकार म्हणून सांगतात, पण अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळय़ासाठी शंकराचार्यांना निमंत्रण दिले नाही. दुसरीकडे केंद्रातील अतिसूक्ष्म लघुमंत्री विचारतात की, शंकराचार्यांचे योगदान काय? अशा लोकांची मी पिसं काढली आहेत असे सांगताना मी कोणाबद्दल बोलत आहे याची तुम्हाला माहिती आहे काय, असा सवाल शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला तेव्हा शिवसैनिकांनी  ‘कोंबडी चोर, कोंबडी चोर’ असा एकच कल्ला केला.