
भाजपकडे जिंकण्याची हिंमत असेल तर त्यांनी अगोदर मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेतल्या पाहिजेत. परंतु, त्यांच्यात ते धाडस नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत येऊन प्रचार करावा आणि महिनाभर थांबावे. हिंमत असेल तर झेंडा फडकवून दाखवावा. काहीही झाले तरी महाराष्ट्राच्या राजधानीवर मराठय़ांचाच झेंडा फडकेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा येथे शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जात असताना खासदार संजय राऊत हे दौंड येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी शिवसेना उपनेते साजन पाचपुते, जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, नामदेव ताकवणे उपस्थित होते.
जरांगे यांची पंतप्रधानांसोबत बैठक घ्यावी
एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी त्यांना विधान परिषदेवर घेऊन तेच मुख्यमंत्री राहतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांना त्यासाठी तोडगा काढण्यासाठी वेळ आहे; परंतु मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱया मनोज जरांगेंसाठी वेळ नाही. फडणवीस यांचे वक्तव्य धिक्कार करण्यासारखे आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार विमानाने दिल्लीला जातात. त्यांनी एअर ऍम्ब्युलन्सने आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांना सोबत घेऊन दिल्लीला जावे आणि पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर बैठक घ्यावी, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
निवडणुकीनंतर कुल जेलमध्ये असू शकतात
दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यातील पाचशे कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल हेदेखील अडकले आहेत. मात्र, त्यांना पाठीशी घातले जात आहे. परंतु, उद्या ते तुरुंगात असू शकतात, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.






























































