
गेल्या एकवीस वर्षांपासून दरोडा, घरफोडी, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची मालिकाच करणाऱ्या आणि सात जिल्ह्यांसह इतर चार राज्यांतील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या अनिल पिंपळे टोळीला मोक्का लावण्यात आला.
सदर टोळीविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल आहे. टोळीतील आठ सदस्यांपैकी तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, अन्य पाचजण सध्या फरार आहेत.
मोक्का लावण्यात आलेल्यांमध्ये अनिल उैर्फ अन्या युवराज पिंपळे (वय 49, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. नगर), तुकाराम भीमराव घोरपडे (वय 54, रा. उंडेवस्ती मातापूरता, ता. श्रीरामपूर ), दाजी धनराज सोळंके (वय 36, रा. हरसुल गायरान नं. 1 लासूर, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर), लाला उैर्फ लालचंद ऊर्फ लालसिंग चंदन सोळंके (रा. द्वारकानगर, पाडेगाव, संभाजीनगर), कोंडीलाल काळे, बयबयी काळे, बंटू पिंपळे आणि कान्हा अंकुश पवार (रा. कऱहेटाकळी, ता. शेवगाव, जि. नगर) यांचा समावेश आहे. यापैकी अनिल पिंपळे, तुकाराम घोरपडे आणि दाजी सोळंके यांना सांगली पोलिसांनी दरोडय़ाच्या गुन्हय़ात अटक केली आहे. टोळीतील अन्य पाचजण अद्यापि फरारी आहेत.
दोन वर्षांपासून टोळीने राज्यासह अन्य राज्यांतही हातपाय पसरले होते. राज्यातील सांगली, सातारा, रायगड, नागपूर, नगर, लातूर, संभाजीनगर पोलीस ठाण्यात तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात टोळीतील सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. सन 2001 ते 2022 या कालावधीत टोळीने अनेक ठिकाणी आपली दहशत माजविली होती. घातक हत्यारे जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, जबरी चोरी, प्रामुख्याने रात्री घरफोडी करणे आदी विविध गुन्हे टोळीवर दाखल आहेत. सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील एका बंगल्यात टोळीने सशस्त्र दरोडा टाकला होता.

























































