
पुणे शहरातील तळजाई परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेही ही 88 वी कारवाई आहे. मोक्का कारवाईमुळे सराईत टोळ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
टोळीप्रमुख सोनू उर्फ आनंद सिद्धेश्वर धडे (वय – 22), प्रेम गणेश चांदणे (वय – 23), नागेश सतीश शिंदे (वय – 18), मंगल्या उर्फ मंगल बाबासाहेब भिसे (वय २३, सर्व रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
संबंधित टोळीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळीविरूद्ध खुनाचा प्रयत्न, लूट, मारहाण, खुनाचा कट असे गंभीर स्वरुपाचे 12 गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्याशिवाय त्यांनी स्वारगेट, कोंढवा, सहकारनगर भागात गुन्हे केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर यांनी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यावतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला. प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंजूरी दिली.
सहा महिन्यांत 25 टोळ्यांविरूद्ध मोक्का
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत गुन्हेगारी करणाऱ्या सराईत टोळ्याविरूद्ध मोक्का कारवाईचा बडगा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उगारला आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत तब्बल 25 सराईत टोळ्यांविरूद्ध मोक्का कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याशिवाय आतापर्यंत 88 टोळ्यांविरूद्ध कारवाई करून मोक्कास्त्र फायदेशीर ठरले आहे.
























































