
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात दुष्काळामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई आणि प्रचंड उन्हामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. हिंगोली जिल्ह्यात तब्बल 1 हजार एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड केलेल्या केळी, संत्री, डाळींबाच्या बागा वाळून गेल्या आहेत. पाणी टंचाईवर मात करत शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन जीवापाड जपलेल्या या फळबागांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान टाकली आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये कापुस, सोयाबीन व अन्य पीकांसोबतच काही शेतकरी फळबागांचीही लागवड करतात. जिल्ह्यात तब्बल 5 हजार एकराच्यावर केळी, संत्री, डाळींब, मोसंबी, आंबा अशा फळबागांची लागवड केल्याचे कृषी विभागाची माहिती आहे. जिल्ह्यात मागिल वर्षीच्या तुलनेत यंदा फक्त 75 टक्के पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात मागिल दोन महिने सातत्याने पारा 42 अंशाच्यावर राहिला असुन 46 अंश सेल्सीअस पर्यंत तापमान यंदाच्या उन्हाळ्यात पोहचले. या प्रचंड उन्हाचा फटका सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत, हिंगोली या तालुक्यामधील 1 हजार एकरापेक्षा जास्त क्षेत्रातील फळबागांना बसला आहे. जलस्रोत आटल्याने औंढा तालुक्यातील पोटा परिसर, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव परिसरात डाळींब व केळीच्या बागा करपून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील वसूल होणे मुश्कील झाल्याने येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

























































