
सामना ऑनलाईन । कोझिकोडे
केरळचे मल्याळी देशात सर्वाधिक जागरूक मतदार असल्याचे एका सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. परदेशात राहणारे हजारो फक्त लोकसभा अथवा विधानसभेच्या मतदानासाठी प्रत्येक पाच वर्षांनी मायदेशी परततात. त्यामुळे एकूण 71 हजार 735 अनिवासी नोंदणीकृत मतदारांत सर्वाधिक म्हणजे 92 टक्के मतदार हे केरळी असल्याचे दिसून आले.
जगभरातील अनिवासी हिंदुस्थानी नागरिकांची संख्या आता 30 लाख आहे. त्यातील फक्त 71 हजार 735 एनआरआय नोंद झालेले मतदार आहेत. विशेष म्हणजे यातील 66 हजार 584 एनआरआय केरळी आहेत. 2014 मध्ये ही संख्या 12 हजार 653 होती त्यात पाच वर्षांत पाचपट वाढ होऊन ती 2019 मध्ये 66 हजार 584 वर गेली आहे. केरळच्या या नोंद झालेल्या एनआरआय मतदारांत 3 हजार 729 महिला असून 8 तृतीयपंथीही प्रत्येक निवडणुकीला मायदेशी परतून मतदान करतात.






















































