मध्य रेल्वे बोंबलली, 84 गाड्या रद्द; ओव्हरटाईम न करण्याची मोटरमनची भूमिका

मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या मध्य रेल्वेच्या मोटरमननी नियमानुसार काम आंदोलन सुरू करत ओव्हरटाईम करण्यास शनिवारी नकार दिला. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. सायंकाळपर्यंत 84 हून अधिक गाडय़ा रद्द झाल्या तर काही गाडय़ा अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱया चाकरमान्यांचे हाल झाले. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी उसळली. त्यातच प्लॅटफॉर्मवर कोणतीही अनाऊन्समेंट होत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

– मध्य रेल्वेचे मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी रेल्वे सिग्नल धोकादायक पद्धतीने ओलांडल्यामुळे त्यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू होती. कारवाईच्या भीतीने त्यांनी शुक्रवारी प्रगती एक्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱयांमध्ये संताप आहे.

– मोटरमन शर्मा यांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी आणि अतिरिक्त काम करण्यास मोटरमननी नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे 84 हून अधिक लोकल फेऱया रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले.