वडाळा रेल्वे स्टेशन ते गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्टेशन ते चुनाभट्टी रेल्वे स्टेशन या दरम्यान हजारो नागरिकांना नाइलाजाने रेल्वे रूळ ओलांडून दररोज ये-जा करावी लागते. नागरिकांच्या सोयीसाठी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग बांधण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी दिले.
मध्य रेल्वे वडाळा, गुरू तेग बहादूर नगर व चुनाभट्टी रेल्वे स्टेशनदरम्यानचे रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करण्याचे मार्ग बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला स्थानिकांनी विरोध आहे. बीपीटी चार नंबर गेट ते आर. ए. किडवाई मार्ग असे रेल्वे रूळ ओलांडून पश्चिमेला जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात येत आहेत. शाखाप्रमुख सचिन खेडेकर व माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी खासदार अनिल देसाई यांच्याकडे कैफियत मांडली.
अनिल देसाई यांनी मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक रजनीश गोयल यांची भेट घेतली. स्थानिकांची रेल्वे रूळ ओलांडण्याची अपरिहार्यता लक्षात घेता लवकरात लवकर या मार्गावर पालिकेशी समन्वय साधून पादचारी पूल बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच तोपर्यंत रेल्वेने नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची विनंती केली.
याच बैठकीत अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील गव्हाणगाव व महात्मा फुले नगर येथे रेल्वेच्या जागेच्या हद्दीत जलवाहिनी टाकण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देण्याची मागणी केली. त्यास तत्काळ मंजुरी देण्याचे आदेश रजनीश गोयल यांनी दिले. या बैठकीला विभागप्रमुख प्रमोद शिंदे, श्रद्धा जाधव, विधासभा प्रमुख गोपाळ शेलार, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख सचिन खेडेकर, विजय भोईर आदी उपस्थित होते