ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि बंगाली सिनेसृष्टीतील महान दिग्दर्शकांपैकी एक असलेले मृणाल सेन यांचे आज सकाळी 10.30च्या सुमारास कोलकाताच्या भवानीपोर येथील राहत्या घरी निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

प्रयोगशील दिग्दर्शक
प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून मृणाल सेन यांची ख्याती होती. त्यांचे सिनेमे समाजाचे वास्तवदर्शन घडवायचे. 14 मे 1923 रोजी बंगालच्या फरीदपूर येथील कस्बे येथे त्यांचा जन्म झाला. चित्रपटापेक्षा त्यांचे पहिले प्रेम हे साहित्यावर होते. 1955 साली ‘रात भोर’ या बंगाली चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नील आकाशेर नीचे, भुवन शोम, एक दिन अचानक, पदातिक, मृगया हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 1983 साली पद्मभूषण आणि 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सेन यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माकपाचे सीताराम येचुरी यांनी शोक व्यक्त केला आहे.