
पालिका क्षेत्रातील सुपर डिलक्स मल्टीप्लेक्सच्या प्रत्येक शोच्या करात आता मोठी वाढ होणार असून एका शोसाठी एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक शोसाठी केवळ 60 रुपये आकारले जात आहेत. मल्टीप्लेक्सच्या कारभाराच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे सांगत पालिका प्रशासनाकडून ही दरवाढ सुचवण्यात आली असून आगामी स्थायी समितीत याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
मल्टीप्लेक्समध्ये एकाच इमारतीत अनेक पडदे असतात. याठिकाणी एकाच वेळी सिनेमांचे अनेक शो सुरू असतात. या सिनेमागृहांमध्ये तिकीट हे 200 रुपयांपासून 1550 रुपयां पर्यंत असते. मात्र या शोसाठी आकरण्यात येणारी केवळ 60 रुपये शुल्क नाममात्र आहे. त्यामुळे प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी 1 हजार रुपये कर आकारण्याचा प्रस्ताव मांडल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पालिकेने 2015 मध्ये मल्टीप्लेक्ससाठी स्वतंत्र श्रेणी तयार करून प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी 66 रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रस्ताव पालिकेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र राज्य सरकारकडून अद्याप या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आलेली नाही. त्यातच आता प्रशासनाने सुधारीत कर प्रस्तावित केला आहे. दरम्यान, मराठी आणि गुजराती नाटकांसाठी पालिकेकडून कोणताही कर घेतला जात नाही.
बंदिस्थ, खुल्या जागेतील कार्यक्रमांनाही करवाढ
बंदिस्त जागेत अथवा खुल्या मैदानात होणाऱया राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत उत्सव, करमणुकीच्या आणि इतर कार्यक्रमांचा करही 33 रुपयांवरून 10 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
मराठी आणि गुजराती नाटकांना महानगर पालिकेकडून करमणुक कर वसुल केला जात नाही. मल्टीप्लेक्स बरोबरच सर्व प्रकारच्या सिनेमागृहांचे, नाटक जलसा आणि करमणुकीच्या इतर कार्यक्रमाचे तसेच, सर्पस, आनंद मेळा यांच्या शुल्कातही 5 ते 6 पट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे.
अशी होणार करवाढ
प्रकार सध्याचा प्रस्तावित कर कर
सुपर डिलक्स मल्टीप्लेक्स 60 1000
वातानुकूलीत सिनेमागृह 66 200
विना वातानुकूलीत सिनेमागृह 50 150
नाटक, जलसा, करमणुकीचे
इतर कार्यक्रम 28 100
सर्कस, आनंदमेळा 55 100
5 हजार पेक्षा जास्त
प्रेक्षकांची उपस्थिती 33 10,000
बंधिस्त किंवा खुल्या जागेत
होणाऱया कार्यक्रमासाठी
इतर करमणूक कार्यक्रमांसाठी 33 120


























































