सीएसएमटीवर 24 डब्यांच्या एक्प्रेस गाड्या लागणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांसाठीचे पाच फलाट आता तब्बल पाऊण किलोमीटर लांबीचे होणार आहेत. त्यामुळे येथून 24 डब्यांच्या एक्प्रेस गाडय़ा चालवणे शक्य होणार असल्याने गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. सीएसएमटी येथून दररोज अनेक मेल-एक्प्रेस गाडय़ा देशाच्या कानाकोपऱयात जातात. फलाट क्रमांक 10 ते 18 वरून या गाडय़ा सोडल्या जात असल्या तरी फलाटाची लांबी कमी असल्याने 18 पेक्षा जास्त डब्यांच्या गाडय़ा चालवण्यावर मर्यादा येतात. त्याची दखल घेतल रेल्वेने फलाट क्रमांक 10 ते 14 या पाच फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी फलाट क्रमांक 10 आणि 11 ची लांबी सध्याच्या 298 मीटरवरून 680 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच 12 ते 14 या तीन फलाटांची लांबी 385 मीटरवरून 690 मीटरपर्यंत केली जाणार आहे. त्यावर 62 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून भविष्यात येथून 24 डब्यांच्या गाडय़ा चालवणे शक्य होणार आहे.