
कोरोना नियंत्रणात असल्यामुळे गंभीर रुग्णांच्या संख्येत घट झाली असून आज रुग्णालयात एकही रुग्ण दाखल करण्यात आला नाही तसेच एकही अति गंभीर रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान, गेले काही दिवस कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंची संख्याही शून्यावर आली आहे. दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 7 रुग्ण सापडले तर 16 जण कोरोनामुक्त झाले.
मुंबईत आज सापडलेल्या रुग्णांपैकी सातही रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात घट झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे. दिवसभरात 2 हजार 1 चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 19 हजार 744 जणांचा मृत्यू झाला आहे.
कालावधी 1 लाख दिवसांहून जास्त
मुंबई महापालिकेकडून मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या लसीकरणामुळे आणि बुस्टर डोसमुळे मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1 लाख 33 हजार 120 दिवसांवर पोहोचला आहे. मात्र, निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, स्वच्छता पाळावी, असे आवाहन महापालिकेकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.
राज्यात 18 रुग्ण
मुंबईस राज्यात कोरोना नियंत्रणात असून आज दिवसभरात राज्यात 18 रुग्ण सापडले तर 30 जण कोरोनामुक्त झाले. संसर्ग बाधितांच्या संपका&त येऊन कोरोना झालेल्या सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून हा आकडा 205 वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनामुळे दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.


























































