
सामना प्रतिनिधी। मुंबई
बेस्टच्या कर्मचाऱयांना मुंबईतील वाहतुकीचे व्यवस्थापन सांभाळताना भयंकर तणावाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील मेट्रो आणि इतर कामांमुळे रस्त्यांवरील बॅरिकेडस् तसेच इतर अडचणींमुळे बेस्टच्या मोठय़ा आकाराच्या बसेसचा अगदी कोंडमारा होत असून प्रवाशांच्या आरोग्याबरोबरच आता बेस्टच्या कर्मचाऱयांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
बेस्टच्या कर्मचाऱयांना ताणतणावात काम करावे लागत असल्याने त्यांना तंबाखूचे व्यसन जडले असतानाच त्यांना ट्रॅफिक जाम आणि बेस्टच्या जुन्या गाडय़ांची वाहतूक करावी लागत असल्याने खिडक्यांच्या तडतड अशा आवाजाने विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. बेस्टची एक गाडी दिवसभरात 170 कि.मी. धावते तर एकूण वाहतूक साडेपाच लाख कि.मी. रनिंग होणे अपेक्षित असते. परंतु ट्रफिकमुळे आणि चालकांच्या गैरहजेरीमुळे प्रत्येकी दहा टक्के असे 20 टक्के आणि अपघात व बिघाडाने 1 ते 2 टक्के असे 22 टक्के ‘लॉसऑफ किलोमीटर’ होते असे बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले.
ड्रायव्हरची डय़ुटी निसर्गनियमाविरुद्ध
बेस्टच्या ड्रायव्हरची पहिली शिफ्ट पहाटे 4.30 वाजता सुरू होते. ते राहायला विरार, पनवेल, वांगणी ते ऐरोली-कोपरखैरणेपलीकडे असून त्यांना तासभर आधीच निघावे लागते म्हणजे त्यांची झोप होत नाही. कागदावर 12 वाजता संपणारी डय़ुटी प्रत्यक्षात दुपारी 2 वाजता संपते. म्हणजे जेवणही नीट होत नसल्याने त्यांना ना ना व्याधी जडतात असे गणाचार्य यांनी स्पष्ट केले. वाहतूककोंडीत तास न तास चालक बसमध्येच अडकून पडल्याने त्यांना जागेवरून हलता येत नाही. त्यामुळे त्यांना पाठदुखीचे, किडनीचे, ब्लडप्रेशर आणि डायबेटीसचे आजार होतात, असेही ते म्हणाले.
बेस्ट कर्मचाऱयांसाठी सातत्याने आरोग्य शिबिरे भरविली जात असून तबांखूमुक्त बेस्ट अभियानास चांगले यश आले असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी स्पष्ट केले.


























































