माहीम किल्ला ते वांद्रे किल्ला पालिकेचा बोर्ड वॉक प्रकल्प!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहीम किल्ला ते वांद्रे किल्ला यादरम्यान सायकल ट्रक, फुटपाथ आणि पर्यावरणपूरक असा बोर्ड वॉक प्रकल्प पालिका राबवणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सादरीकरण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती सादर केली.

मुंबईकरांसाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पांबाबत आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱयांची बैठक घेऊन आवश्यक सूचना केल्या. यामध्ये बोर्ड वॉक प्रकल्प राबवताना पर्यावरणाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देशही त्यांनी पालिका प्रशासनाला दिले. 5 मीटर रुंदीचा हा बोर्ड वॉक प्रकल्प राबवताना वांद्रे-वरळी सागरी सेतूला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत मलबार हिल येथील काही भागात जमीन खचण्याचे प्रकार घडले होते. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांची माहितीही यावेळी सादर करण्यात आली. भूस्खलन झालेल्या परिसराची पुन्हा पडझड होऊ नये यासाठी 105 मीटर लांबीची उंच भिंत बांधण्यात येत असून भिंत आणि टेकडीच्या दरम्यान भराव टाकण्यात येत असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. शिवाय काँक्रीट रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. तसेच टेकडीलगतच्या रस्त्यांची कामेदेखील वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले.

रस्त्यांसाठी 5 वर्षांचा मास्टर प्लान तयार करा!

पालिकेच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याच्या कामांची माहितीदेखील यावेळी पालिकेकडून देण्यात आली. पालिका आणि इतर शासकीय यंत्रणांच्या अखत्यारीत येणाऱया रस्त्यांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देशही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. मुंबईतील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी पुढील 5 वर्षांचा प्रशासकीय विभागनिहाय मास्टर प्लान तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.