
जयेंद्र लोंढे
मूळच्या मुंबईकराने परदेशात डंका वाजवलाय. सौरभ नेत्रावळकर हे त्याचे नाव. त्याची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबईच्या बहुतांशी क्रिकेटपटूंनी हिंदुस्थानसाठी खेळताना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवलाय. मुंबईकर मराठमोळ्या क्रिकेटपटूंची जागतिक क्रिकेटमधील ‘दादागिरी’ वर्षानुवर्षे अविरतपणे सुरु आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ ही मंडळी मुंबईचा झेंडा फडकवण्याचे काम इमानेइतबारे करताहेत. मात्र याच दरम्यान मूळच्या मुंबईकराने परदेशात डंका वाजवलाय. सौरभ नेत्रावळकर हे त्याचे नाव. त्याची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
ऍपच्या माध्यमातून खेळाची चाचपणी
सौरभ नेत्रावळकर याने अमेरिकेत उच्च शिक्षण पूर्ण केले. त्याने कॉम्प्युटर सायन्सच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात धाव घेतली. मात्र मुंबईसाठी खेळत असतानाच त्याने एक ‘ऍप’ तयार केले होते. या ऍपद्वारे खेळाडूंना आपल्या खेळाची चाचपणी करता येत होती. क्रिकेट या खेळातील बारकावे समजण्यासाठी या ‘ऍप’ची मोलाची मदत झाली.
उत्कृष्ट डावखुरा गोलंदाज
डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून सौरभ नेत्रावळकरने आपली छाप सोडली. तसेच त्याच्याकडे चेंडू आत आणण्याचे कौशल्य उत्तम होते. एअर इंडिया या क्लबमधून त्याने क्रिकेट खेळण्याचा अनुभव संपादन केला. हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांनीही त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले.
राहुल, मयांक, मनदीप, जयदेवसोबत खेळण्याचा अनुभव
न्यूझीलंडमध्ये 2010 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ‘टीम इंडिया’चे प्रतिनिधित्व केलेला सौरभ नेत्रावळकर हा लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मनदीप सिंग, संदीप शर्मा आणि जयदेव उनाडकट या हिंदुस्थानी खेळाडूंसोबतही क्रिकेट खेळला आहे.
…अन् पुन्हा
क्रिकेटच्या मैदानावर
2013-14 च्या हंगामात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सौरभ नेत्रावळकर यालाही हिंदुस्थानच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करायचे होते. उच्च शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत जावे लागले. मात्र, तो क्रिकेटपासून फार काळ लांब राहू शकला नाही. नियतीने त्याला पुन्हा मैदानावर उतरण्यास भाग पाडले. आता तो अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार झाला आहे. इब्राहिम खलील या हिंदुस्थानी खेळाडूच्याच जागी त्याची निवड झाली आहे. अमेरिकेच्या संघात सौरभसह सनी सोहेल आणि जस्करन मल्होत्रा या हिंदुस्थानी खेळाडूंचा समावेश आहे.























































