चेंबूर बालसुधारगृहातील 18 मुलांना कोरोना, मुले बाधित होण्याची मुंबईतील दुसरी मोठी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी आग्रीपाडय़ातील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील 16 मुलांसह 6 महिला कर्मचारी अशा 22 जणांना कोरोना झाल्याची घटना ताजी असताना चेंबूरच्या बालसुधारगृहातील 18 मुलांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाने मोठय़ा प्रमाणात बाधित होण्याची मुंबईतील ही दुसरी घटना आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्प झाले आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच आता कोरोना रुग्णांची दररोजची संख्याही वाढत चालली आहे. त्यात आग्रीपाडय़ातील घटनेनंतर चेंबूरच्या बालसुधारगृहातही कोरोनाने आपले हातपाय पसरल्याचे समोर आले आहे. बालसुधारगृहातील एक मुलाला ताप येऊ लागल्यानंतर बुधवारी शताब्दी रुग्णालयात त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. गुरुवारी आणखी दोन मुलांची कोरोना चाचणी केली असता ही दोन्ही मुले पॉझिटिव्ह निघाली. त्या पार्श्वभूमीवर बालसुधारगृहातील सर्व 102 मुलांची शुक्रवारी पालिकेच्या आरोग्य पथकाकडून चाचणी करण्यात आली असता त्यातील आणखी 15 मुलांना कोरोना झाल्याचे समोर आले. त्यामुळे या 18 मुलांवर चेंबूर-वाशी नाका येथील व्हिडीओकाॅन अथिती कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

राज्यात नवीन रुग्णसंख्या चार ते पाच हजारांवर स्थिरावली

राज्यात नवीन रुग्णसंख्येत घट होत असली तरी मागील काही दिवसांत ही रुग्णसंख्या चार ते पाच हजारांवर स्थिरावली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात 4 हजार 666 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या 4 हजार 831 इतकी होती. आज दिवसभरात एकूण 3 हजार 510 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या 4 हजार 455 इतकी होती. आज कोरोनामुळे 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर 2.12 टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण 62 लाख 63 हजार 416 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के इतके झाले आहे.

18 मुलांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली योग्य उपचार सुरू आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. – महेंद्र उबाळे, सहाय्यक आयुक्त, एम-पूर्व

यातील 4 मुले 12 ते 13 वयोगटातील, 6 मुले ही 16 ते 17 वयोगटातील, 14 ते 15 वयोगटातील 5, 17 ते 18 वयोगटातील 2 मुले तर 1 मुलगा हा 9 वर्षांचा आहे. जे मुले निगेटिव्ह आली आहेत त्यांचे बालसुधारगृहात योग्य प्रकारे विलगिकरण करण्यात आले आहे. पालिका प्रशासन सर्व परिस्थितीवर योग्य लक्ष ठेवून आहे. – डॉ. हरीश नवनी, आरोग्य अधिकारी