मुंबईत रुग्णसंख्या स्थिर, निर्बंधांमुळे सरासरी दररोज 8 हजार रुग्णसंख्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 10 हजारांवर गेलेली कोरोनाची आकडेवारी गेल्या काही दिवसांतील कडक निर्बंधांमुळे कमी झाली असून दररोज सरासरी 8 हजारांवर स्थिरावली आहे. हा आकडा असाच स्थिर राहिला तर कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, असे म्हणता येईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत फेब्रुवारी 2021च्या मध्यापासून रुग्णसंख्या वाढत गेली. मार्च आणि एप्रिलमध्ये ही संख्या वाढत जाऊन 11 हजारांवर पोहोचली. सक्रिय रुग्णांचा आकडाही वाढला तर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी कमी होऊन 34 दिवसांवर आला होता. सध्या मुंबईत 87 हजार रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालय व कोरोना केंद्रांमध्ये बेडची मागणी वाढली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना चाचण्या वाढल्या असतानाही दररोज सरासरी 8 हजारांच्या संख्येनेच रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट सध्या तरी स्थिरावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुर्ला, चेंबूर, घाटकोपरमध्ये घट

गेल्या काही दिवसांत कुर्ला, चेंबूर, घाटकोपरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असून रविवारी कुर्ल्यात 182, चेंबूरमध्ये 183 तर घाटकोपरमध्ये 273 वर आली आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी सध्या 44 दिवसांवर आला आहे. मात्र अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि ग्रँट रोड या विभागातील रुग्णसंख्या वाढत असून 15 ते 17 एप्रिल या तीन दिवसांत या प्रत्येक विभागात दीड हजारावर नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

इमारतींमध्ये नियम कडक, पण संख्येत वाढ

झोपडपट्टी, चाळींपेक्षा इमारतींमध्ये आजही सर्वाधिक 80 टक्के रुग्ण सापडत आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱया सोसायटय़ा मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्या जात असून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र इमारतींमध्ये नियम कडक केले असले तरी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायटय़ांच्या पदाधिकाऱयांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणाऱयांची पालिकेकडे तक्रार करणे, क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे, बाहेरील व्यक्तीस प्रवेशबंदी, जीवनावश्यक वस्तू सोसायटीच्या गेटवर स्वीकारणे, त्याचबरोबर पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पालिका प्रशासनाला कळवणे बंधनकारक केले आहे. हे नियम पाळले नाहीत तर सोसायटीला 10 हजारांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.