तापी नदीत पोलिसांचे ऑपरेशन मिशन पिस्तूल

मुंबई क्राईम ब्रँच युनिट 9 ने सुरतच्या तापी नदीत ऑपरेशन मिशन पिस्तूल राबवले. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर सागर पाल आणि विकी गुप्ताने ते पिस्तूल तापी नदी येथे टाकले होते. ते पिस्तूल पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. स्थानिक मच्छीमाराच्या मदतीने पोलीस ते पिस्तूल शोधत आहेत.

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सागर आणि विकी यांची कसून चौकशी झाली. चौकशीदरम्यान त्याने ते पिस्तूल सुरतच्या तापी नदीमध्ये टाकल्याचे सांगितले. गोळीबार प्रकरणात न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल हा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे ते पिस्तूल शोधणे पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे.

आज सकाळी क्राईम ब्रँच युनिट 9 मधील 10 ते 15 जणांचे पथक गुप्ता आणि पालला घेऊन सुरत येथे गेले. सुरत पोलिसांच्या मदतीने युनिट 9 चे पथक तापी नदी येथे सकाळी आले. सुरत गुन्हे शाखेचे पोलीस, डायव्हर आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी आज तापी नदीत त्या पिस्तुलाचा शोध घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तापी नदीत त्या पिस्तुलाचा शोध घेत होते. गुप्ता आणि पाल हे सुरतला उतरले. त्यानंतर ते रेल्वे ब्रिज येथून तापी नदी येथे गेले. तापी नदीत पिस्तूल फेकल्यानंतर ते दोघे सरकारी बसने भुजला गेले होते. चिंतेची बाब म्हणजे तापी नदीची खोली अरुंद आणि सतत वाहते पाणी असल्याने ते पिस्तूल शोधणे हे चॅलेंजिंग असणार आहे. पुरावे नष्ट करणे, धमकावणे आणि प्रवृत्त केल्याप्रकरणी या गुह्यात पोलिसांनी आणखी तीन कलमांची वाढ केली आहे.

दोघांकडे होती पिस्तूल

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करताना गुप्ता हा मोटारसायकल चालवत असल्याने त्याने पिस्तुलाचा वापर केला नाही. तर पालने गोळीबार केल्याचे एका व्हिडिओत कwद झाले. गोळीबार केल्यानंतर ते दोघे भूजला जाणाऱया एक्प्रेसमध्ये चढले. धावत्या एक्प्रेसमधून त्याने ती पिस्तूल नदीत टाकली. गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अमोल बिष्णोईच्या सांगण्यावरून त्या दोघांनी गोळीबार केल्याचे समजते. सलमानला घाबरवून दहशत निर्माण करायची. त्यानंतर इतर लोकांकडून या टोळीला पैसे उकळायचे होते. लॉरेन्स बिष्णोई हा साबरमती कारागृहात आहे. तर अनमोल हा परदेशात असल्याचे समजते.