
मुंबईसह राज्यातील विविध भागातून चोरी केलेले अॅपल फोन खरेदी करायचे, मग त्या मोबाईलचे आयडी रिमुव्ह करून ते परराज्यात किंवा परदेशात विकायचे. ज्या मोबाईलचे आयडी रिमूव्ह करता येत नाही ते मोबाईल पार्ट वेगवेगळे करून ते कमी किमतीत विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना यश मिळाले आहे.
एमआरए मार्ग पोलिसांत अॅपल मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा सपोनि सुशीलकुमार वंजारी, जालिंद्र लेंभे व पथक तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करीत असताना एक चोरटा हाती लागला. त्याच्याकडून चोरीचे 21 अॅपल मोबाईल व 12 सीम कार्ड हस्तगत करण्यात आले. त्याच्या चौकशीत आणखी मोठी माहिती समोर आली. त्यानुसार वंजारी, लेंभे व त्यांच्या पथकाने सखोल चौकशी करीत चोरीच्या अॅपल मोबाईलची अशा प्रकारे विक्री करून आपला खिसा भरणाऱया चौघांना पकडून आणले.


























































