एनसीबीने ड्रग्ज तस्करांच्या ठेचल्या नांग्या, आंतरराज्य ड्रग्ज तस्करी करणारी टोळी गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आंतरराज्य ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. एनसीबीने कारवाई करून 1400 सीबीसीएसच्या बाटल्या आणि 6000 नित्रेझेम गोळ्या जप्त केल्या आहेत. ड्रग्ज तस्करीप्रकरणी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून पाच जणांना अटक केली. ड्रग्ज तस्करीचे धारावी कनेक्शन उघड झाले आहे.

कोपरखैरणे येथील एक जोडपे ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने झेड. कुरेशी आणि एस. कुरेशी या जोडप्याला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत आणखी काही तस्करांची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने कारवाई करून 920 सीबीएसएसच्या बाटल्या जप्त केल्या. एनसीबीने एकाची चौकशी केली. त्याच्या चौकशीत आर. सिंगचे नाव समोर आले. त्याला शीव परिसरातून सिंगला ताब्यात घेतले. सिंगच्या चौकशीत मीरा रोड येथील आणखी एका तस्कराची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने डी. कौशल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 6000 नशेच्या गोळ्या आणि सात सीबीसीएसच्या बाटल्या जप्त केल्या. कौशलच्या चौकशीनंतर एनसीबीला पांडे नावाच्या तस्कराची माहिती मिळाली. एनसीबीने पांडेला ताब्यात घेऊन 480 सीबीसीएसच्या बाटल्या जप्त केल्या. अटक केलेले पाच जण हे आंतर राज्य ड्रग्जची तस्करी करायचे. ते धारावी येथील एकाकडून ड्रग्ज खरेदी करायचे.

मालवणीतून 50 लाखांचे हेरॉईन जप्त 

हेरॉईनची तस्करी करणाऱ्या बाऊन्सरला मालवणी पोलिसांनी अटक केली. सोहेल शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 50 लाख 40 हजार रुपयांचे हेरॉईन जप्त केले. गोरेगाव ते दहिसर परिसरात ड्रग्जची विक्री आणि खरेदी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी पोलिसांना दिले आहेत. त्या आदेशानुसार पोलिसांनी ड्रग्ज तस्करांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रविवारी मालवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश साळुंखे हे गस्त करत होते. गस्तीदरम्यान मालवणी गेट नंबर 6 च्या नाल्याजवळ शेख हा संशयास्पद दिसला. पोलिसांना पाहताच शेख हा पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 126 ग्रॅम हेरॉईन जप्त केले.