सावधान! कोरोना देशभरात झपाट्याने पसरतोय, मुंबई, दिल्लीचा आर व्हॅल्यू 2च्या पुढे

कोरोनाचा एका व्यक्तीपासून दुसऱया व्यक्तीला संसर्ग होण्याचे प्रमाण म्हणजे आर व्हॅल्यू (रिप्रोडक्शन नंबर) ही 2 टक्क्यांपेक्षा पुढे गेल्यामुळे देशात कोरोना झपाटय़ाने पसरत आहे. मुंबईची आर व्हॅल्यू 2.01 तर दिल्लीची आर व्हॅल्यू 2.54 वर पोहोचली असून ही महानगरे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. मुंबई आणि दिल्लीपाठोपाठ चेन्नई, पुणे, बंगळुरू, कोलकाता यांसारख्या महत्त्वाच्या शहरांची आर व्हॅल्यूही 1 टक्क्याच्या पुढे गेली आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना झपाटय़ाने पसरत असून मुंबईत बुधवारी एकाच दिवसात कोरोनाचे 2 हजार 500 रुग्ण सापडले तर दिल्लीत 923 रुग्ण सापडल्यामुळे चिंता वाढली आहे. चेन्नई येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्सचे प्राध्यापक सीताभ्र सिंहा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या झपाटय़ाने पसरणाऱया संसर्गाबाबत देशभरातील कोरोनाच्या रिप्रोडक्शन नंबरचा म्हणजे आर व्हॅल्यूचा अभ्यास करण्यात येत आहे. यात मुंबई, दिल्ली यांची आर व्हॅल्यू देशात सर्वात जास्त असून या शहरांमध्ये कोरोनाचा झपाटय़ाने संसर्ग होत असल्याचे म्हटले आहे. मुंबई आणि दिल्लीपाठोपाठ पुणे आणि बंगळुरूमध्ये आर व्हॅल्यू 1.11, चेन्नई 1.26, कोलकाता 1.13 वर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये या सर्व शहरांचा आर व्हॅल्यू 1 टक्क्यांपर्यत होता, मात्र दोन महिन्यांत त्यात झपाटय़ाने वाढ झाली आहे. मुंबई आणि दिल्लीत झपाटय़ाने पसरत असलेल्या कोरोनामुळे आर व्हॅल्यू ही 2 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. हे चित्र भीतीदायक आहे, असेही सिंहा म्हणाले.

‘आर-व्हॅल्यू’ म्हणजे काय

1) एका रुग्णापासून किती जणांना संसर्ग होतो याला ‘री-प्रोडक्शन नंबर’ म्हणजे आर व्हॅल्यू म्हणतात.
2) हा दर एकपेक्षा जास्त असेल तर कोरोना प्रसार वेगाने होत असल्याचे मानले जाते तर एकपेक्षा कमी प्रमाण असल्यास संसर्ग आटोक्यात असल्याचे मानले जाते.
3) ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू या 6 शहरांचा आर व्हॅल्यू केवळ 1 टक्का इतका होता. मात्र, आता दीड महिन्यात ही व्हॅल्यू 1 टक्क्याच्या पुढे तर मुंबई आणि दिल्लीत 2 टक्क्यांच्या पुढे गेली आहे.