
सामना प्रतिनिधी। मुंबई
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात कुठेही अनधिकृत होर्डिंग्ज लावल्यास शिवसेना भवन येथे पक्षातर्फे प्रसिद्ध केलेल्या 1800228595 टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
शिवसेनेतर्फे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश तंतोतंत पाळले जातात. या तक्रारींची त्वरित दखल घेऊन सदर होर्डिंग्ज पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी पाठवून काढले जातात. ताकीद देऊनही पुन्हा अनधिकृत बॅनर आढळल्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पक्षातर्फे कडक कार्यवाही केली जाते. तसेच उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार तशी तक्रार निवारण नोंदवही आजही शिवसेना भवनमध्ये आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात आहे. कुठल्याही प्रकारे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात येता कामा नये. त्यानंतरही शिवसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अथवा कार्यकर्त्यांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिवसेना पक्ष अशा कृत्यांना जबाबदार राहणार नाही. उच्च न्यायालयाने यावर कारवाई केल्यास त्याची जबाबदारी या कायद्याचे उल्लंघन करणाऱया व्यक्तीवर सर्वस्वी राहील. पक्ष जबाबदार नसेल, असे या पत्रकात म्हटले आहे.


























































