
मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने मे महिन्यात ड्रग्जविरोधात जोरदार कारवाया केल्या. तब्बल 63 गुन्हे दाखल करून 73 तस्करांना बेडय़ा ठोकण्यात आल्या. तर दोन कोटी 60 लाख 12 हजार किमतीचे वेगवेगळे ड्रग्ज जप्त केले.
अमली पदार्थविरोधी कक्षाकडून ड्रग्ज तस्करांविरोधात धडक कारवाया सुरू आहेत. मात्र एका मे महिन्यात ड्रग्जविरोधात मोठय़ा प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. 20 लाख 73 हजारांचा गांजा, 39 लाख 18 हजार किमतीचे हेरॉईन, 25 लाख 17 हजाराचे चरस, एक कोटी 31 लाख 14 हजार किमतीचे एमडी, सात लाख 11 हजाराचे कोकेन आणि 36 लाख 77 हजार किमतीचे अन्य ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. अवघ्या एका महिन्यात 63 गुन्हे दाखल करून 73 तस्करांना अटक करण्यात आली. त्यात आफ्रिकन वंशाच्या दोघा ड्रग्ज माफियांचा समावेश आहे. तर दहा लाखापेक्षा अधिक किमतीचा ड्रग्ज असलेले पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तब्बल 111 किलो 922 ग्रॅम वजनाचा ड्रग्ज साठा जप्त केला. यापुढेही अशा कारवाया सचरूच राहणार असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.





























































