मुंबईत 14 पूल धोकादायक; गणेशोत्सवात गर्दी करू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव अवघ्या आठवडय़ावर आला असताना पालिकेने खबरदारी म्हणून आगमन-विसर्जनासाठी धोकादायक असलेल्या 14 पुलांची यादी जाहीर केली आहे. हे 14 पूल जुने झाले असून काही पुलांची दुरुस्ती सुरू आहे. तर काही पूल पावसाळ्यानंतर सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे या पुलांवरून गणेशमूर्तीचे आगमन किंवा विसर्जन करताना गर्दी करू नये, लाऊडस्पीकरचा वापर करू नये आणि पुलावर जास्त वेळ थांबू नये, असे निर्देश पालिकेने दिले आहेत.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे 350 पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी आठवडाभर आधीच धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

मध्य रेल्वेवरील धोकादायक ब्रिज

  • घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज
  • करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज
  • आर्थर रोड-चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज
  • भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज

पश्चिम रेल्वेवरील धोकादायक ब्रिज

  • मरीन लाइन्स रेल्वे ओव्हर ब्रिज
  • सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज
  • फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज
  • केनडी रेल ओव्हर ब्रिज
  • फॉकडॅण्ड रेल्वे ओव्हर ब्रिज
  • बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रिज
  • महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रिज
  • प्रभादेवी-पॅरोल रेल ओव्हर ब्रिज
  • दादर-टिळक रेल ओव्हर ब्रिज
  • अंधेरी स्टेशनजवळील गोखले रेल्वे ब्रिज
  • 16 टनांपेक्षा जादा भार नको

कोरोना काळामुळे सलग दुसऱया वर्षी गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीवर बंदी असली तरी लालबाग-परळ अशा दक्षिण-मध्य भागातून निघणाऱया सार्वजनिक गणपतींच्या आगमन-विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. यामध्ये पुलावर गर्दी करू नये आणि एका वेळी भाविक व वाहनांचा मिळून 16 टनांपेक्षा जादा भार पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे.