एका वर्षात मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार, नितीन गडकरींचे आश्वासन

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण केव्हा होणार हा प्रश्न कोकणवासींना पडलेला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हाच प्रश्न गुरुवारी लोकसभेत उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हे काम एका वर्षात पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्याने विस्तारीकरण आणि कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यावरील प्रचंड वाहतूक, लांबलेला पाऊस यामुळे या कामावर परिणाम तर झालाच आहे शिवाय संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

नितीन गडकरी यांनी लोकसभेत उत्तर देत असताना म्हटले की या मार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले आहे. जमिनीच्या छोट्या तुकड्यावरून भावाभावांमध्ये वाद असतात, ते हाणामारीपर्यंत जातात. या वादांमुळे अधिग्रहणाचे काम रखडले होते असं अप्रत्यक्षपणे गडकरी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आता हे काम पूर्ण झाले असून वर्षभराच्या आत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल असा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमिपूजनाचा नारळ आठ वर्षांपूर्वी फुटला होता. यानंतर चकचकीत गुळगुळीत आणि रुंद रस्त्यांवरून सुसाट गावाला जाता येईल अशी स्वप्न कोकणवासीयांनी उराशी बाळगले होते. मात्र रखडलेले काम, भयंकर खड्डे, कामाच्या नावाखाली करोडोंच्या निधीची झालेली वाटमारी यामुळे पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरण खड्ड्यात गेले होते. कमी अधिक प्रमाणात इतर टप्प्यांचीही अशीच परिस्थिती आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे व अरुंद रस्त्यांमुळे गेल्या अनेक वर्षांत असंख्य अपघात होऊन शेकडो प्रवाशांचे बळी गेले. या विरोधात पत्रकारांनी आवाज उठवून मोठे आंदोलन छेडले. त्यानंतर सरकारने 2011 साली मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू केले. एकूण 10 टप्प्यांत या महामार्गाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या