
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना यंदाही वाहतूककोंडीच्या विघ्नाला सामोरे जावे लागणार आहे. कारण मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपास यंदाही नापास झाला असून लेनचे काम अजूनही अर्धवट आहे. फक्त ५० टक्केच काम पूर्ण झाल्याने येथून प्रत्यक्षात वाहतूक सुरू करणे अशक्य होणार आहे. गणपतीपूर्वी माणगाव बायपास लेन सुरू करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेकांनी दिले होते. पण ही घोषणा हवेतच विरणार असून कोकणात जाताना भक्तांचा प्रवास धोकादायक होणार आहे. सरकारच्या या बेफिकीर कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणेशोत्सव फक्त वीस दिवसांवर आला असून कोकणात जाण्यासाठी आतापासूनच चाकरमान्यांची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातून सुमारे पाच ते सहा लाख वाहने कोकणाच्या दिशेने मार्गस्थ होतात. या वाहनांमधून सुमारे १० ते १५ लाख चाकरमानी कुटुंबासह प्रवास करतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर विशेषतः माणगाव परिसरात वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण होतो. माणगाव शहरातून मुंबई-गोवा मार्ग जात असून तेथेही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुनील तटकरे तसेच रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी माणगाव बायपासवरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याची घोषणा केली होती.
पुन्हा येरे माझ्या मागल्या
माणगाव बायपास हा या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उपाय मानला जात आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना कामाची सद्यस्थिती पाहता बायपास सुरू करण्याचे आश्वासन पूर्ण होणार की पुन्हा एकदा ‘येरे माझ्या मागल्या’ यानुसार चाकरमान्यांना कोंडीचा सामना करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र सध्याची कामाची स्थिती पाहता पुढील अवघ्या वीस दिवसांत हे शिवधनुष्य पेलणे शक्य होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
- बायपास मार्गातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या ठिकाणी आवश्यक गर्डरदेखील टाकले नसल्याने हा टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.
भरावासाठी टाकलेल्या मातीचा झाला चिखल
बायपासच्या रस्त्याच्या भरावासाठी टाकण्यात आलेली माती मुसळधार पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाली आहे. परिणामी रस्त्याच्या पुढील कामांनाही अडथळे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात कामाची गती मंदावल्याने उर्वरित काम अल्पावधीत पूर्ण करणे बांधकाम यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आता तर गणपतीच्या आगमनास अतिशय कमी कालावधी उरला असल्याने माणगाव बायपास लेनचे काम कसे वेळेत पूर्ण करणार, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे.





























































