
उद्योगपती मेहुल चोक्सीला फरार घोषित करण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने गुरुवारी मोकळा केला. सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही कारवाई करणार आहे. याविरोधात चोक्सीने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी ईडीने अर्ज तयार केला आहे. हा अर्ज कायद्याच्या चौकटीत व नियमानुसार तयार करण्यात आला आहे. त्यात काही त्रुटी नाही. या कारवाईत हस्तक्षेप करण्यासारखे काही नाही, असे नमूद करत न्या. सारंग कोतवाल यांनी चोक्सीची याचिका फेटाळून लावली.
सीबीआयने फेब्रुवारी 2018 मध्ये चोक्सीविरोधत भ्रष्टाचार, फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याचे आरोपपत्रही दाखल केले. जुलै 2018 मध्ये ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल केला. चोक्सीला फरार घोषित करण्यासाठी ईडीने विशेष न्यायालयात अर्ज केला. हा अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी करणारा अर्ज चोक्सीने दाखल केला होता. हा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.