
मुंबई महापालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाजवळील हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मार्च अखेरपर्यंत हिमालय पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे रस्ता ओलांडून ऑफिस गाठण्याची धावपळ करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल 24 मार्च 2019 मध्ये कोसळला आणि या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर 31 प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने नवीन पूल बांधण्याबाबत आराखडा तयार केला. पालिकेच्या पूल विभागाने तयार केलेल्या आराखडय़ानुसार नवीन पूल स्टेनलेस स्टीलचा बांधण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि 2020 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु वाहतूक विभागासह अन्य विभागाच्या परवानग्या मिळेपर्यंत पुलाचे काम सुरू होण्यास उशीर झाला. त्यात मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि पुलाचे काम खोळंबले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुलाचे काम पुन्हा सुरू झाले. दरम्यान, ओडिशातून 120 टनाचे आणलेले स्टेलनेस स्टीलचे 5 गर्डर पुलावर बसवण्यात आले आहेत. सध्या पुलावरील सिमेंट -क्राँक्रीटचे काम सुरू असून मार्च अखेरपर्यंत पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने दिली.
टिकाऊ स्टेनलेस स्टीलचे मजबूत बांधकाम
पुलावर मजबूत अशा स्टेनलेस स्टीलचे पाच गर्डर टाकण्यात आले असून एका गर्डरची लांबी 35.211 मीटर इतकी आहे. अत्यंत महत्त्वाचे हे काम गेल्या महिन्यात 8 जानेवारीला पूर्ण झाले. लोखंडी पुलाला पावसाळय़ात गंज पकडतो. त्यामुळे नव्याने बांधण्यात येणारा हिमालय पूल स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा पूल पुढील 50 वर्षे टिकेल असा दावा करण्यात आला आहे.


























































