बिस्किट आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलीचा दुकानातील कामगाराने विनयभंग केला. बिस्किट देण्याच्या बहाण्याने दुकानात बोलावून कामगार नको ते कृत्य करू लागला, परंतु चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यांची जाण असल्याने त्या मुलीने तेथून सुटका करून घेतली आणि त्या कामगाराविरोधात पोलिसांत तक्रार दिली.
काळाचौकी परिसरात हे निंदनीय कृत्य घडले. आठ वर्षांची मुलगी बिस्किट आणण्यासाठी गेली होती तेव्हा दुकानात कोणी नसल्याचे हेरून कामगाराने मुलीला आत बोलावले. मग तो तिच्याशी नको ते कृत्य करू लागला. आपल्या सोबत चुकीचे घडत असल्याचे लक्षात येताच मुलीने तेथून सुटका करून घेत थेट आपले घर गाठले आणि घडला प्रकार आईला सांगितला. मुलीला घेऊन तिची आई दुकानात गेली व तिने त्या कामगाराला जाब विचारला असता तो उलटसुलट बोलू लागला. त्यामुळे दोघींनी काळाचौकी पोलीस ठाणे गाठून त्या कामगाराविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.