
सामना ऑनलाईन । मुंबई
थंडीचा मुक्काम लांबल्याने दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाणवणारा उकाडा जाणवत नव्हता. मात्र, आता वातावरणात बदल होत असून मुंबई आता चांगलीच तापणार आहे. येत्या 72 तासात मुंबईचे तापमान 40 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. मुंबईसह महाराष्ट्राचा किनारपट्टीचा भाग, मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्येही तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणातील आद्रर्ता कमी होऊन शुष्कता वाढणार आहे. त्यामुळे तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्राकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात उष्ण वारे वाहणार आहेत. हे वारे अतिउष्ण आणि शुष्क असल्याने तापमानात वाढ होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुबईकरांना वातावरणात होणारा बदल जाणावत आहे. मात्र, येत्या 72 तासात तापमानात आणखी वाढ होऊन ते 40 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा भाग आणि मध्य महाराष्ट्रातही तापमानात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या तापमान 34-35 अंशावर आहे. ते येत्या 72 तासात 40 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात सरासरी तापमानातही वाढ झाली आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रतही सरासरी तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होणार आहे. काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 27 मार्चनंतर अरबी समुद्राकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर उष्णतेच्या लाटेतून दिलासा मिळणार आहे. त्यानंतर तापमान नेहमीच्या 34-35 अंशावर स्थिरावणार आहे.


























































