मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागाची वर्गणी दामदुप्पट, वाचकांची नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागात येऊन वाचन करणाऱयांना आता दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. आतापर्यंत 10 रुपयांची पावती फाडून संदर्भ विभागात दिवसभरासाठी बसता यायचे. मात्र आता 20 रुपये मोजावे लागणार आहेत. पीएचडी, एमफिलच्या विद्यार्थ्यांना 25 रुपये वर्गणी द्यावी लागेल. ही वाढ येत्या 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यामुळे संदर्भ विभागात नियमित येणाऱया वाचक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही शतक महोत्सवी वास्तू मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी कार्यरत आहे. ग्रंथालयाचा संदर्भ विभाग म्हणजे विद्यार्थी, संशोधक, साहित्यिक यांच्यासाठी मौल्यवान ठेवा आहे. अनेक जण पुस्तकं वाचण्यासाठी येतात. कॉलेज विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. शाळकरी मुलेही शाळेने दिलेल्या प्रोजेक्टचे काम करण्यासाठी येतात. पूर्वी त्यांच्याकडून आठ रुपये वर्गणी घेतली जायची. नंतर सुट्टय़ा पैशांच्या चणचणीमुळे ती 10 रुपये करण्यात आली आणि आता थेट 20 रुपये इतकी करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

संदर्भ विभागाचे वर्गणी शुल्क वाढविण्यापेक्षा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या भव्य वास्तूंचा योग्य उपयोग करून उत्पन्न मिळवावे अशी भावना नियमित वाचकांनी व्यक्त केली आहे. ग्रंथसंग्रहालयाच्या मुंबईतील 45 पैकी 11 शाखा बंद पडल्या आहेत. ज्या सुरू आहेत, तेथील वाचक संख्याही घटत आहे, असे असताना संदर्भ विभागाची वर्गणी वाढवून गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे अशा प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या आहेत.

शारदा सिनेमागृह कधी सुरू होणार?
दादर पूर्वेकडील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वास्तूत शारदा सिनेमागृह होते. गेल्या वर्षी शारदा सिनेमागृहाचा भाडेतत्त्वावरील करार 30 नोव्हेंबरपासून संपुष्टात येऊन ती जागा ग्रंथसंग्रहालयाच्या ताब्यात आली. मात्र तेव्हापासून हे थिएटर बंद आहे. ते पुन्हा कधी सुरू होणार याबाबत चित्रपट प्रेमींमध्ये उत्सुकता आहे. यासंदर्भातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विश्वस्त पातळीवर चर्चा होऊन निर्णय झालेला आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे ही दीर्घ प्रक्रिया आहे अशी प्रतिक्रिया ग्रंथालयाचे प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी यांनी दिली.