मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; दै. ‘सामना’चे देवेंद्र भगत यांना सरमळकर पुरस्कार

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले. दै. ‘सामना’चे उपसंपादक, वार्ताहर देवेंद्र भगत यांना ‘कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घर दुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील वार्तांकनासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार, 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते पत्रकार भवन, आझाद मैदान येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी गुरुवारी केली. बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील वृत्तांतासाठीचा आप्पा पेंडसे पुरस्कार अल्पेश करकरे आणि दिनेश मराठे यांना विभागून देण्यात येणार आहे. दिवाकर शेजवळ यांच्या ‘सूर्यप्रभा’ या ग्रंथाला जयहिंद प्रकाशन तर ललित लेखनासाठीचा विद्याधर गोखले पुरस्कार नितीन सप्रे यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट राजकीय वृत्तांतासाठीचा रमेश भोगटे पुरस्कार उदय जाधव यांना तर शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा ‘शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार संजीव भागवत यांना प्रदान करण्यात येणार आहे.