मुंबईची दाणादाण! रस्ते पाण्याखाली, रेल्वे लटकली, वाहतुकीचे तीनतेरा

मुंबईत मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी रौद्ररूप धारण केल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. रेल्वे लटकली. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा झाले. सुदैवाने पालिकेने सकाळीच धोक्याचा इशारा देऊन आवश्यक उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.

हवामान खात्याकडून मुंबईत बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र मुंबईत मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार गडगडाटासह पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर इतका भयंकर होता की अनेक ठिकाणी रस्त्यावरून चालणेही मुश्किल बनले. 24 तासात शहरात 267.62, पूर्व उपनगरात 173.22 तर पश्चिम उपनगरात 251.48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने शहरात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरल्याचे प्रकार घडले. शीव, कुर्ला, चुनाभट्टी, मस्जिद स्थानकादरम्यान पाणी साचल्याने रेल्वे सीएसएमटी ठाणे आणि सीएसएमटी वाशी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. दादर हिंदमाता, किंग सर्कल, शीव रोड नंबर 24, मालाड सबवे, वांद्रे टॉकीज, शास्त्री नगर गोरेगाव, अंधेरी सबवे, भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस आदी भागात पाणी साचल्याने या मार्गावरील रस्ते आणि बेस्ट वाहतूक वळवण्यात आली आहे.

रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

मुंबईत मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने मिठी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मिठी नदीकिनाऱ्यावर राहणारऱ्या रहिवाशांना पालिका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास आणि गरज भासल्यास काही ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

या ठिकाणी बेस्टची वाहतूक वळवली

  • उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
  • भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
  • सायन मेन रोडमार्गे सायन रोड 24
  • मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम
  • लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
  • भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
  • जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्वेâट सबवे

मान्सूनचाच पाऊस! आजपासून ओसरणार

जोरदार गडगडाटासह पाऊस झाल्याने परतीचा पाऊस असल्याचे बोलले जात होते. मात्र हा परतीचा पाऊस नसून मान्सूनच असल्याचे हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. मध्य हिंदुस्थानात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस पडत आहे. उद्या गुरुवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाचे प्रमाण कमी होईल अशी माहितीही त्यांनी दिली. पालघरमध्ये मात्र उद्याही जोरदार पाऊस होईल असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या