जागतिक वृक्षनगरी पटकावण्यात मुंबई महानगरपालिकेची हॅट्ट्रिक

स्वच्छ-सुंदर मुंबई आणि प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या मुंबई महापालिकेने जागतिक वृक्षनगरी प्रकारात संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून सलग तिसऱ्यांदा ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार पटकावला आहे. झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्ष उत्सव आयोजित करणे, अशी पाच मानांकनांची मुंबईने पूर्तता केली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजित बांगर, डॉ. सुधाकर शिंदे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत मानपत्र पालिकेला सुपूर्द करण्यात आले.