दुकानांवर मराठी पाटय़ा लावण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत संपल्यानंतर पालिकेने 10 ऑक्टोबरपासून मुंबईभरात झाडाझडती सुरू केली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी 2 हजार 158 ठिकाणी तपासणी केल्यानंतर मराठी पाटी नसलेल्या 522 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. यानुसार संबंधितांना पुढील आठवडाभरात याबाबत कार्यवाही करावी लागणार आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार असून प्रत्येक कामगारामागे दोन हजारांचा दंड होऊ शकतो.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क’ (1) च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून ठळक अक्षरांत नामफलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत पहिल्यांदा 31 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र व्यापारी संघटनांनी कोरोनाचा फटका आणि आर्थिक कारण देत तीन वेळा मुदत वाढवून घेतली होती. ही अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली.
यादरम्यान, व्यापारी संघटनांनी पालिकेच्या कारवाईच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र याबाबत न्यायालयाकडून पालिकेला कोणत्याही सूचना आल्या नसल्याने पालिकेने 10 ऑक्टोबरपासून सर्व 24 वॉर्डमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे.
75 टक्के जणांकडून अंमलबजावणी
पालिकेने सुरू केलेल्या कारवाईत पहिल्याच दिवशी 2 हजार 158 भेटी देण्यात आल्या. यामध्ये 1 हजार 636 ठिकाणी म्हणजेच पाहणी केलेल्या 75 टक्के दुकानांवर मराठी नामफलक ठळक अक्षरांत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उर्वरित ठिकाणी मराठी नामफलक नसल्याने संबंधितांनी तातडीने अंमलबजावणी करावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


























































