
मरीन ड्राईव्ह येथील कोस्टल रोडवर बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांकडून सहा ते सात अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चालकांनी मरीन ड्राईव्हच्या दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर अतिवेगाने आणि बेदरकारपणे गाड्या चालवून इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 3 सप्टेंबर रोजी रात्री 11.15 च्या सुमारास घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फुटेजमध्ये हिरव्या, लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या गाड्या दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरून अतिवेगाने जात असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस हवालदार सतीश निवृत्ती सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी या अज्ञात चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 281 आणि 125 अन्वये, तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



























































