
मुंबई परिसरातील वीज केंद्रांमध्ये बिघाड होऊन मुंबापुरीचा वीजपुरवठा खंडित झाला तरी आता येथील ग्राहकांना विजेचे टेन्शन असणार नाही. विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार अदानी एनर्जी सोल्युशनने खारघर-विक्रोळीदरम्यान तब्बल 75 सर्किट किलोमीटर लांबीची 400 केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी उभारली असून ती आज कार्यन्वित केली आहे. त्यामुळे राज्यभरातून आता मुंबईत अतिरिक्त एक हजार मेगावॅट वीज आणणे शक्य होणार आहे.
सध्या मुंबईची विजेची कमाल मागणी चार हजार मेगावॅट असून ती पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे येथील वीज पेंद्रातून 1100 मेगावॅट, अदानीच्या डहाणू वीज पेंद्रातून 500 मेगावॅटपर्यंत वीज उपलब्ध होते, तर उर्वरित वीज राज्याच्या ग्राडमधून घेतली जाते, तर राज्याच्या ग्राडमधून मुंबईत वीज वाहून आणण्यासाठी टाटा पॉवरची खोपोली-कळवा-सालशेत आणि महापारेषणच्या वीजवाहिन्या उपलब्ध आहेत. त्याची क्षमता तीन हजार मेगावॅटच्या घरात आहे, मात्र मुंबईनजीकच्या वीज पेंद्रात बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्यास राज्यात वीज उपलब्ध असूनही 2800-3000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज वाहून आणता येत नाही. त्यामुळेच 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत ब्लॅकआऊट झाला होता. राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असूनही केवळ पुरेशा वीजवाहिन्या नसल्याने ती मुंबईत वाहून आणता आली नव्हती. त्याची गंभीर दखल घेत वीज आयोगाने खारघर-विक्रोळीदरम्यान 400 केव्ही आणि 220 केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी आणि जीआयएस सबस्टेशन विक्रोळी येथे उभारण्याचे काम अदानी एनर्जी सोल्युशनला दिले होते. त्यानुसार त्यांनी सदरची वीजवाहिनी उभारून आज कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी राज्याच्या ग्रीडमधून एकूण 4000 मेगावॅट वीज आणणे शक्य होणार आहे.
वाढती मागणी पूर्ण करता येणार
सध्या मुंबईची विजेची कमाल मागणी चार हजार मेगावॅटच्या घरात असून त्यामध्ये वर्षाला 200-250 मेगावॅटची भर पडत आहे. तसेच पुढील काळात मेट्रो ट्रेन आणि उभा राहणाऱया टोलेजंग इमारतींमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. मात्र सध्याची मुंबईतील अंतर्गत वीज निर्मिती क्षमता 1600 मेगावॅट असून बाहेरून 3000 मेगावॅट अशी एकूण 4500 मेगावॅट वीज उपलब्ध होते. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती होती, मात्र आता एक हजार मेगावॅट एवढी अतिरिक्त वीज मुंबईत आणणे शक्य होणार असल्याने विजेची वाढती मागणी सहजपणे पूर्ण करता येणार आहे.


























































