खबर बेकायदा गुटखा वाहतुकीची; मिळाले 41 लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हाजी अलीहून ग्रॅण्ट रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून एका टेम्पोने बेकायदेशीर गुटख्याची तस्करी होणार असल्याची खबर ताडदेव पोलिसांना मिळाली. त्यानुसार ताडदेव सर्पल येथे सापळा रचून पोलिसांनी तो टेम्पो पकडल्यावर टेम्पोत गुटख्याऐवजी गोणपाटात लपवून ठेवलेली 41 लाखांची रोकड सापडली.

एपीआय अरुण थोरात यांना याबाबत खबर मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार थोरात, अंमलदार शुक्ला, राठोड, पाटील या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. टेम्पोमध्ये तपासणी केली असता आत इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि एका गोणपाटात खाकी कागदात गुंडाळून ठेवलेले दोन हजार व 500 च्या नोटा सापडल्या. पैसे मोजले असता ती 41 लाखांची रोकड असल्याचे स्पष्ट झाले. ही रोकड केणाकडून घेतली आणि कोणाला देण्यात येणार होती याबाबत टेम्पोचालकाला माहिती देता न आल्याने पोलिसांनी पैसे जप्त करून चालकाला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.