
‘राज्यात सध्या निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा’ असा सल्ला वाढदिवसाची पार्टी मागणाऱया आपल्या मैत्रिणीला मुंबईतील समता पाटील या महिलेने दिला होता. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी ‘जबाबदार नागरिक’ म्हणत समता यांचे कौतुक केले असून वाढदिवसाची भेट म्हणून त्यांच्या घरी चॉकलेट केक पाठवला आहे. मुंबई पोलिसांच्या या कृतीने पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला खास दिवस. आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींसोबत करावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केल्यामुळे बाहेर जाऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणे शक्य नाही. 22 एप्रिल रोजी समता पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांच्या मैत्रिणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पार्टी मागितली होती. त्यावर ‘घरी राहा सुरक्षित राहा’ असा सल्ला त्यांनी आपल्या मैत्रिणीला दिला.
मैत्रिणीसोबतच्या या गप्पा त्यांनी मुंबई पोलिसांसोबत ट्विटरवर शेअर केल्या होत्या. त्यावर मुंबई पोलिसांनी त्यांचे कौतुक करत त्यांच्याकडे पत्ता आणि संपर्क क्रमांक मागितला. यानंतर त्यांच्या घरी चॉकलेट केक पाठवला. जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल कौतुक करणारा मेसेजदेखील पाठवला.
मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये पोलिसांनी म्हटलंय, ‘तुमच्या खास दिवशी घरी राहिल्याबद्दल आणि जबाबदार नागरिकाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल आमच्याकडून तुमच्या कौतुकाचा हा छोटासा प्रयत्न. आजचं तुमचं हे सुरक्षित सेलिब्रेशन आपल्या शहराला उद्या आनंदी करेल. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!’




























































