
सामना प्रतिनिधी। मुंबई
शहरात हत्या, सोनसाखळी चोरी, घरफोडी या गुन्ह्यांची संख्या कमी होत असताना बलात्कार आणि विनयभंग या गुन्ह्यांची मात्र वाढतच आहे. प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील गुन्हेगारीची माहिती उघड केली.
वर्ष 2013पासून ते वर्ष 2018पर्यंत मुंबईत घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आज प्रजा फाऊंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आली. त्यानुसार हत्या, घरफोडी, सोनसाखळी चोरी व वाहन चोरीच्या गुन्हयांचा आलेख काही टक्क्यांनी कमी झालेला दिसत असून विनयभंग, बलात्कार व दंगलीच्या घटनांमध्ये मात्र वाढ झालेली आहे. तर पोक्सो कलमान्वये दाखल होणाऱया गुन्ह्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. शिवाय मुंबई पोलीस दलात मनुष्यबळदेखील कमी असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
























































