मुंबईला उष्माघाताचा ऍलर्ट; पारा चाळिशीवर जाणार, पालिकेच्या रुग्णालयांत कोल्ड रूम

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऱयाने सातत्याने चाळिशीपर्यंत धडक मारल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. यातच अजून काही दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईला एकप्रकारे ‘उष्माघाता’चा ऍलर्टच मिळाला आहे. त्यामुळे पालिका आरोग्य विभागही खडबडून जागा झाला असून सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये उष्माघातबाधित रुग्णांसाठी ‘कोल्ड रूम’ बेड तैनात करण्यात आले आहेत. शिवाय पालिकेच्या 103 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांमध्येही वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली आहे.

 संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. तर वाढलेल्या उकाडय़ात उष्माघातासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक जनजागृती करून मुंबईकरांना आवश्यक माहिती देण्यात येत असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

उष्माघाताची लक्षणे

उष्माघातात प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फॅरनहीटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे ही लक्षणे दिसतात. लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, तोंडाची त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसतात.

असे करा प्रथमोपचार

  •  पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून रुग्णाला आडवे झोपण्यास सांगावे.
  •  त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात/सावलीत आणावे.
  •  मूल जागे असल्यास वारंवार थंड पाण्याचे घोट पाजावेत.
  •  हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा.
  •  थंड पाण्याच्या पट्टय़ांचा वापर करावा.
  •  कपडे घट्ट असल्यास सैल करावेत.
  •  उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे.
  •  पालिका अथवा जवळच्या रुग्णालयाशी संपर्क करा.

असा करा बचाव

  •  उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी, –  दुपारी 12 ते सायं. 4 वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा.
  •  घराबाहेरील कामे सकाळी 10 वाजेच्या आत किंवा सायंकाळी 4 नंतर करा.
  •   पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. थेट येणारा सूर्यप्रकाश / उन्हाला टाळावे.
  •  पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी असे द्रवपदार्थ घ्या.
  •   उन्हात चप्पल न घालता अनवाणी चालू नये, चहा, कॉफी इत्यादी गरम पेये टाळावीत.

मुंबईच्या दक्षिण मुंबई, मुलुंडसह ठाणे, पालघर, बदलापूर अशा काही ठिकाणी पारा चाळिशीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

सुषमा नायर, आयएमडी, मुंबई

पालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि  इतर  रुग्णालयांत उष्माघातबाधित रुग्ण आल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या 14 रुग्णालयांत उष्माघातबाधित रुग्णांसाठी  कोल्ड रूम आणि औषधे उपलब्ध ठेवली आहेत.

उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.