सी लिंकजवळ रॅश ड्रायव्हिंग; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

सी लिंक परिसराजवळ रॅश ड्रायव्हिंग करणाऱया तिघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. संतोष कडू, भावेश बाणे आणि रियाज शेख अशी या तिघांची नावे आहेत. त्या तिघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. गेल्या तीन दिवसांत वांद्रे पोलिसांनी स्टंटबाजी आणि रॅश ड्रायव्हिंग करणाऱया 12 जणांवर कारवाई केली आहे.

रात्रीच्या वेळेस सी लिंक, बी.के.सी, खेरवाडी, वाकोला उड्डाणपुलावर कर्कश हॉर्न वाजवणे, वेडीवाकडी वळणे घेत स्टंटबाजीच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱयांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. नियमित बंदोबस्त लावून स्टंटबाजी करणाऱया मोटारसायकलस्वाराची पोलिसांनी कोंडी केली. त्यामुळे सी लिंक परिसरात स्टंटबाजीचे प्रमाण कमी झाले आहे पण काही हौशे गौशे स्टंटबाज हे पोलिसांची नजर चुकवून सी लिंकजवळ येतात अशांवर पोलीस नजर ठेवून असतात. शनिवारी रात्री वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने सी लिंक परिसरात नाकाबंदी लावली होती. नाकाबंदीदरम्यान पहाटे तीन वाजताच्या सुमारास काही मोटारसायकलस्वार हे भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून स्टंटबाजी करत होते. विरुद्ध दिशेने मोटारसायकल चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाईदरम्यान त्या तिघांना ताब्यात घेतले. तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या गुरुवारी वांद्रे पोलिसांनी सी लिंक येथील झेंडा पॉइंट आणि कॉजवे येथे मोटारसायकलस्वारांविरोधात कारवाई केली होती.