
सामना प्रतिनिधी। मुंबई
मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राच्या ‘एसएनएमआर’ विषयाच्या 80 गुणांच्या या पेपरमध्ये काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे विचारल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. या पार्श्वभूमीवर अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी विद्यापीठाला एक प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिकेतील चुकीचा प्रश्न हा दहा गुणांचा असल्यामुळे हा प्रश्न मूल्यांकनातून रद्द करून राहिलेल्या 70 गुणांचे रूपांतर 80 गुणांमध्ये करण्यात येईल, असे विद्यापीठाने सोमवारी स्पष्ट केले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आठव्या सत्राच्या ‘एसएनएमआर’ विषयाचा पेपर 14 मे रोजी घेतला होता. या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार विद्यापीठाने तीन विषयतज्ञांकडून सूचना मागवल्या होत्या. प्रश्न क्रमांक 1 (बी) हा अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 4 (ए) हा ऐच्छिक असून विद्यार्थी पाचपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवू शकतो. परंतु प्रश्न क्रमांक 1 (बी) आणि प्रश्न क्रमांक 4 (ए) हे दोन्ही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे आहेत असा निष्कर्ष तज्ञांनी दिला. त्याआधारे अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी विद्यापीठाला प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.




























































