मुंबईकरांना मिळणार बदलते हवामान, पावसाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष आता अधिक सक्षम होणार आहे. बदलते हवामान आणि पावसाळय़ात समुद्राला येणारी भरती याची अचूक माहिती मुंबईकरांना मिळावी यासाठी मुंबई शहर व दोन्ही उपनगरात आणखी 60 ठिकाणी हवामानदर्शक यंत्र बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पावसाची इत्थंभूत माहिती मुंबईकरांना मिळावी यासाठी ‘डिझास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ अ‍ॅप अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका 17 कोटी 33 लाख 51 हजार रुपये खर्च करणार आहे.

मुंबईत पावसाळय़ात अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचते. त्याचबरोबर संभाव्य दरडी कोसळण्याची ठिकाणे, वाहतूककोंडी, मोडकळीला आलेल्या अतिधोकादायक इमारती तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था असलेल्या महापालिकेच्या शाळा, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये, याची माहिती पालिकेच्या “Disaster Management MCGM” अ‍ॅपवरून मुंबईकरांना दिली जाते. मुंबई शहर व उपनगरात होत असलेल्या पावसाचा दर 15 मिनिटांचा दर तासाचा तसेच दर 24 तासांचा अद्ययावत अहवाल उपलब्ध अ‍ॅप आणि संकेतस्थळावरून उपलब्ध होतो. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉईड आणि आयओएस अ‍ॅप तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संकेतस्थळ पावसाळय़ापूर्वी अद्ययावत करण्यात येणार आहे. अनेक नवीन बाबींची अ‍ॅपमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी तीन वर्षांच्या देखभालीचे कंत्राट देण्यात येणार आहे.

हवामानदर्शक यंत्रणेत महत्त्वाचे बदल

हवामानदर्शक यंत्रणेतही मोठी सुधारणा करण्यात येणार आहे. पालिकेच्या विविध इमारती आणि मालमत्तांवर सध्या 60 हवामानदर्शक यंत्रे सुरू आहेत. या यंत्राद्वारे हवामान अंदाज, वाऱ्याचा दाब आणि वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील दमटपणाचे प्रमाण, पर्जन्यमापनाची तीव्रता, किती पाऊस पडला याची माहिती मिळते. यामध्ये आणखी 60 नवीन यंत्रे बसवली जाणार आहेत. यंत्र पुरवठा, बसवणे, तपासणे आणि कार्यान्वित करणे ही कामे कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणार आहेत.