कांदिवली येथील आगीत सासू-सुनेचा मृत्यू, चार पाहुणे वाचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी रात्री कांदिवली येथील हंसा हेरिटेज इमारतीत लागलेल्या आगीत सासू-सुनेचा मृत्यू झाला आहे. रंजनबेन पारेख आणि नीता पारेख अशी त्या दोघींची नावे आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांना अग्निशमन दलाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. घडल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

रंजनबेन या हंसा हेरिटेज इमारतीच्या 14व्या मजल्यावर कुटुंबीयांसोबत राहत होत्या. शनिवारी रात्री त्यांच्या घरी पाहुणे आले होते. ते सर्व गप्पागोष्टीत रंगले असताना त्यांच्या घरात अचानक आग लागली. आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दल आणि कांदिवली पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दलाचे 4 फायर इंजिन, 3 जेट्टी घटनास्थळी आले. आगीमुळे सर्वत्र घरात धूर झाला. जीव वाचवण्यासाठी दोघी हॉलमध्ये गेल्या. त्या दोघींना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवले. कुलिंग ऑपेरेशनदरम्यान अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी गेले. तेव्हा रंजनबेन आणि नीता या दोघी हॉलमध्ये दिसल्या. त्या दोघींना अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली आणले. उपचारासाठी त्या दोघींना रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्या दोघींना मृत घोषित केले.

चार पाहुणे वाचले 

दिवाळीनिमित्त रंजनबेन यांच्या मुलाचे दोन मित्र, त्यांच्या बायका असे चौघे जण आले होते. ते सर्व जण गप्पा मारत असतानाच अचानक आग लागली. आग लागल्यानंतर ते रूममध्ये एका ठिकाणी गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या पाहुण्यांना आगीतून सुरक्षित बाहेर काढले.