
सामना प्रतिनिधी। मुंबई
बॉलीवूड दिग्दर्शक विकास बहल यांची लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. रिलायन्सच्या अंतर्गत समितीने विकास बहलला क्लिनचीट दिली आहे.
गोवा येथे 2015 मध्ये एका महिलेने विकासवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. विकासकडे रिलायन्सच्या फँटम फिल्म संस्थेचे काही शेअर्स आहेत. रिलायन्सने अंतर्गत समिती गठीत करून मीटू प्रकरणाची चौकशी केली. संबंधित महिलेला जेव्हा जेव्हा समितीने पाचारण केले, तेव्हा तेव्हा त्या महिलेने चौकशीसाठी येण्याचे टाळले. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्यानंतर विकास निर्दोष असल्याचा निर्वाळा समितीने दिला. ‘मी टू’ चा आरोप झाल्यावर सुपर 30 सिनेमाच्या टीममधून विकासचे नाव काढून टाकण्यात आले होते. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या दोघांनीही त्याच्याशी आर्थिक संबंध तोडले होते. अभिनेत्री कंगना राणावतनेही विकासवर छेड काढल्याचे आरोप केले होते.




























































